Share Market Updates : सेन्सेक्सने ४ महिन्यांनंतर पार केला ६० हजारांचा टप्पा, गुंतवणूकदार मालामाल | पुढारी

Share Market Updates : सेन्सेक्सने ४ महिन्यांनंतर पार केला ६० हजारांचा टप्पा, गुंतवणूकदार मालामाल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सने ४ महिन्यांहून अधिक काळानंतर ६० हजारांचा (Share Market Updates) टप्पा पार केला आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये महागाईत झालेली अल्प घट आणि भारतीय भांडवली बाजारात विदेशी निधीचा नवा ओघ सुरु झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या सकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्सने उसळी घेतली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ०.५ टक्क्यांनी ६० हजारांवर पोहोचला. दुपारी १ च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे ४०० अंकांनी वाढून ६०,२२७ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ११६ अंकांनी वधारुन १७, ९०० वर व्यवहार करत होता. एप्रिलच्या सुरुवातीला सेन्सेक्सने ६० हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर तब्बल ४ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. (Share Market Updates)

एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय भांडवली बाजारात मंगळवारी १,३७६.८४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या (Bombay Stock Exchang) आकडेवारीनुसार, उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सुमारे २५ ट्रिलियन रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. अखिल भारतीय बाजार भांडवली मुल्य ११ जुलै रोजी २५,३१९,८९२ कोटी रुपये होते. ते काल मंगळवारपर्यंत २७,७९२,२९० कोटी रुपयांवर पोहोचले.

जुलैच्या सुरुवातीपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारदारांकडून (FPIs) गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून भारतीय बाजारांमध्ये सातत्याने समभागांच्या विक्रीचा सपाटा सुरु होता. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये राबविण्यात आलेले चलनविषयक कडक धोरण, डॉलरची वाढती मागणी आणि अमेरिकी बाँड्समधून उच्च परतावा आदी गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या.

NSDL डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारदारांनी २०२२ मध्ये आतापर्यंत २०२,२५० कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. जुलैमध्ये, एकूण ४,९८९ कोटी रुपयांच्या समभाग खरेदीसह ते निव्वळ खरेदीदार राहिले होते. ऑगस्टमध्ये आतापर्यंत त्यांनी आणखी २२,४५३ कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या आहेत.

Back to top button