गुंतवणूक : कशी हवी आयुष्याची संध्याकाळ? | पुढारी

गुंतवणूक : कशी हवी आयुष्याची संध्याकाळ?

‘डोक्यावर चांदी आली की खिशात सोन्याची नाणी खुळखुळायला हवीत,’ या म्हणीप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी अर्थाला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे अर्थ(पैसा)आहे, त्याच्या जगण्यात अर्थ अन् आनंदीआनंद आहे.

ज्यांच्याकडे ‘अर्थ’(पैसा) नाही, त्याच्या जगण्यात अर्थ नाही. पैसा नसलेले अर्थहीन वृद्धांना येत असलेली हतबलता प्रत्येक क्षणोक्षणाला खालील कारणांमुळे अनुभव मिळत आहेत.

1) कुटुंबांतील सदस्यांना खर्चासाठी पैसा देऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंबात मानसन्मान नाही.

2) नातेसंबंध टिकवण्यासाठी नातेवाईक व नातवंडांना बक्षीस देता येत नाही म्हणून नातेसंबंध दुरावलेत.

3) समाजकार्यासाठी पैसा खर्च करू शकत नाही म्हणून खंत वाटत आहे.

4) आयुष्यभर इतरांच्या सुखासाठी झटत आलो; पण पैशाअभावी स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत.

5) जवळ पैसा नाही म्हणून दैनंदिन गरजांसाठी वृद्धापकाळी शरीर साथ देत नसतानाही नाइलाजास्तव पैशासाठी काम करावे लागत आहे.

6) प्रत्येक क्षणाला पैसा लागतो. मुलांपुढे पैशासाठी हात पसरविण्यात लाज वाटत आहे.

7) आयुष्यभर केलेले कष्ट अन् शरीराची झालेली झीज, पाचवीला पूजलेले आजारपण, त्यासाठी नियमितपणे शारीरिक तपासणी, दैनदिन औषधोपचार, मोठ्या ऑपरेशनला येणार्‍या मोठ्या खर्चासाठी पैसा नाही म्हणून कुटुंब हतबल झाले आहे.

8) कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नावर जगत असल्याने कुटुंबावर बोजा बनून राहिल्याची खंत वाटत आहे. परिणामी सुनांकडून कुटुंबात लाजिरवाणी, अपमानस्पद वागणूक मिळत आहे.

9) आयुष्याच्या संध्याकाळी आजारांसोबत जगताना आजारपणात स्वतःची सेवा करण्यासाठी (केअरटेकर) काळजीवाहक ठेवावे लागतात. केअरटेकर शिवाय चालत नाही अन् त्यांचा खर्च सोसवत नाही.
असे अनेक वाईट अनुभव आजारपणात मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागतो म्हणून पुरेसा पैसा, रोख स्वरूपात संपत्ती आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याकडे हवीच. तरच सर्व काही आलबेल आहे.
आपल्या देशात 72% वृद्ध लोकांकडे पुरेसा पैसा नसल्याने ती मुलांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत.

यांच्याजवळ पैसा का नाही?

– तर त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

1) मी रिटायर होणार आहे, रिटायरमेंट काळात उत्पन्न नाही; पण खर्च मोठा असतो, हे तरुणपणी मान्य केले नाही. त्यामुळे रिटायरमेंटचे योग्य आर्थिक नियोजन केले नाही.

2) ‘पैसा आला की खर्च करा, आजच जीवनाचा आनंद घ्या… कशाला उद्याची बात’ ही वृत्ती जोपासल्याने भविष्यातील गरजांसाठी गुंतवणुकीला महत्त्व दिले नाहीत.

3) बचत केली, पण नको त्या ठिकाणी कमी व्याजाने गुंतविले. गुंतवणुकीत शहाणपण दाखविला नसल्याने सगळा पैसा महागाईने खाल्ला.

4) कुटुंबाचा खर्च भागविताना पैसाच शिल्लक राहात नाही, मग गुंतवणूक कुठून करू?

5) आयुष्यभर कमविलेला मोठा पैसा स्वप्नातील घरासाठी खर्च केला, ज्यातून एक रुपया उत्पन्न मिळत नाही.

6) रिटायरमेंटसाठीचे महत्त्व अन् याचे नियोजन कसे करावे, हे माहीत नाही.

7) मुलांच्या भवितव्यासाठी स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली. ज्या संपत्तीचे वाढलेले आकडे पाहतो, पण ती संपत्ती विकू शकत नाही. ती संपत्ती मुलांना हवी आहे.
8) सातत्याने व्यवसायात गुंतवणूक होत गेली आहे. काळ बदलला. व्यवसायात कर्जे आहेत अन् व्यवसायवर मुलांचे नियंत्रण आहे. त्यामुळे स्वत:चे उत्पन्न नाही.

9) अनेकजणांनी रिटायरमेंटनंतर नियमितपणे भाडे मिळावे म्हणून सदनिका घेतल्या आहेत. पण तिथून तुटपुंजे भाडे येत आहे, जे खर्चासाठी अपुरे पडत आहे.

10) अनेकजणांनी जमविलेली स्वतःची जमापुंजी मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या लग्नासाठी खर्च केली आहे. ती मुले स्वतःच्या संसारात रमली आहेत. त्यांच्याकडून खर्चासाठी पैसे मिळत नाहीत.

ही वेगवेगळी कारणे आहेत. यामुळे आज साठीच्या वृद्धांकडे पैशाची कमतरता पाहायला मिळत आहे. आज दैनदिन कारणांसाठी जगताना जरूरीप्रमाणे पैसा मिळत नाही. आपले आयुष्य फुकट गेल्याची हतबलता पाहायला मिळत आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला जर निवांतपणा हवा असेल, तर त्याची तरतूद दोन भागात करणे गरजेचे आहे. पहिली 30 वर्षे. नंतरची 30 वर्षे. म्हणजेच 30 – 30 चा नियम लक्षात ठेवला पाहिजे. हा नियम सांगतो की, माणूस सर्वसाधारणपणे 30 वर्षे नोकरी/व्यवसाय करून काही प्रमाणात पैसा साठवून, आपल्या निवृत्तीनंतरच्या 30 वर्षांची तरतूद केली पाहिजे. कारण त्याला 60 नंतरच्या आयुष्याची संध्याकाळ आनंदात जाण्यासाठी व आजच्या राहणीमानाचा दर्जा आपल्या पश्चातही जोडीदारासाठी उत्तमपणे राहण्यासाठी रिटायरमेंट काळात दरमहा नियमितपणे वाढत्या महागाईनुसार प्रतिवर्षी वाढत्या (कॅशफ्लो) पैशाचा प्रवाह मिळणे, ही काळाची गरज आहे.

रिटायरमेंट फंड पुरवून, पैसा वाढवून वापरला पाहिजे. यासाठी सर्व तरुणांनी वेळीच जागरूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे शोधून स्वतःच्या रिटायरमेंट नियोजनला महत्त्व दिले पाहिजे.

1) आज आपल्या जोडीचे, पती-पत्नीचे वय किती आहे? दोघांच्या वयात किती अंतर आहे? कारण आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला स्वतःचे उत्पन्न मिळायला हवे.

2) दरमहाचा दैनंदिन खर्च किती आहे? दरमहाचा खर्च काढताना पुढील गोष्टी गृहीत धरा. राहत्या घराचा फाळा, मेंटेनन्स, पाणी बिल, वीज बिल, गॅस, पेपर बिल, लॉडरी बिल, दरमहा किराणा, भाजीपाला, फळे, दूध बिल, इतर खाऊ, राहणीमानासाठी खर्च कुटुंबातील सदस्यांना लागणारी नवीन कपडे, मोबाईल, ब्युटी पार्लर, स्पा, हेल्थ क्लब इत्यादी. वाहतूक खर्च, कुटुंबातील गाड्या, पेट्रोल, मेंटेनन्स, विमा, ड्रायव्हर पगार, गाड्या धुणे, मनोरंजन – हॉटेलिंग, छोटी सहल, मोठी सहल, औषधोपचार – डॉक्टर फी, नियमित तपासणी, औषधे सण-समारंभ खर्च, नातेवाईकांसाठी आहेर, बक्षीस, समाजकार्यावर होणारा खर्च, छंद जोपासण्यासाठी होणारा खर्च, क्लब फी, जिम, डान्स क्लास वगैरेंसाठी होणारा खर्च, अशा सर्व गोष्टींवर होणारा दरमहा खर्च किती आहे? याचा आढावा घ्या. रिटायरमेंटवेळी कोणते खर्च वाढणार आहेत, याचा अभ्यास करा.

3) आपण कोणत्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहात?
4) आपण किती वर्षे जगणार? अंदाजे आयुष्यमर्यादा किती असेल? उदा. 80 वर्षे किंवा 85 वर्षे. कारण त्या वयापर्यंत आपल्याला पैशाचा प्रवाहाची गरज असणार आहे?
5) वाढणारी महागाईचा दर किती असणार?
6) रिटायरमेंटपूर्वी गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार?
7) रिटायरमेंटनंतर मिळणारा परतावा किती असणार?

या सर्व प्रश्नाची अभ्यासपूर्वक उत्तरे आपल्याकडे असतील आणि त्यानुसार गुंतवणूक करीत असाल, तर तुम्ही रिटायरमेंटसाठी योग्य मार्गाने पुढे जात आहात असे समजावे.

यासाठी खालील उदाहरण पाहावे.

दादासाहेब पाटील, वय वर्षे 42, त्यांची पत्नी संगीता – वय वर्षे 37, दोन मुले, असे चौकोनी कुटुंब आहे. या कुटुंबाचा दरमहा एकूण खर्च रु 32,000/- इतका आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च गृहीत धरला नाही. खासगी नोकरी असल्याने पेन्शन नाही.
त्यांना रिटायरमेंट 60 व्या वर्षी घ्यावी लागणार आहे.
त्यांचे आयुष्य मर्यादा 80 वर्षे गृहीत धरले आहे. संगीताचे 80 वर्षे वयापर्यंत म्हणजेच साठीनंतर 25 वर्षे त्यांना वाढत्या महागाईनुसार पैशाच्या प्रवाहाची गरज भासणार आहे.
वाढती महागाईचा दर 6% गृहीत धरले आहे.
रिटायरमेंटसाठी गुंतवणूक, दरमहा कपात होणारा प्रा. फंड जो वयाच्या 60 व्या वर्षी 65 लाख इतका मिळणार आहे. या माहितीवरून त्यांना रिटायरमेंट फंड किती लागेल?

आजचा दर महिन्याला होणारा 32000/- खर्च हा वयाच्या साठव्या वर्षी 18 वर्षांनंतर 6% महागाईने

60 व्या वर्षी 93,477/-
65 व्या वर्षी 1,25,094/-
70 व्या वर्षी 1,67,403 /-
75 व्या वर्षी 2,24,023/-
80 व्या वर्षी 2,99,794/-
85 व्या वर्षी 4,01,192/-

वरीलप्रमाणे दरमहा वाढत्या महागाईने कुटुंबाचा खर्च असणार आहे. त्यासाठी वरीलप्रमाणे पैशाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी दादासाहेब पाटील यांची 60 व्या वर्षी रिटायरमेंट फंड 3,29,16,504/- इतकी रक्कम हवी. त्यांपैकी त्यांना 65 लाख प्रा. फंड रक्कम मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्यांना 2,64,16,504/- इतका फंड निर्माण करावा लागणार आहे. या कार्यासाठी त्यांच्याकडे अजून 18 वर्षे अवधी उपलब्ध आहेत. जर त्यांनी माझा प्रा. फंड पुरेसा आहे म्हणून रिटायरमेंट नियोजनाकडे दुर्लक्षित केले, तर त्यांना वृद्धापकाळी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. वेळीच जागे होऊन एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराला भेटले पाहिजे. आपल्या कुटुंबातील आर्थिक उद्दिष्ट्ये ठरवून चांगला परतावा मिळणार्‍या इक्विटीसारख्या मालमत्तेमध्ये वरीलप्रमाणे रिटायरमेंट फंड निर्माण करण्यासाठी चांगला पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे म्हणून माझे प्रामाणिक मत असे की, भविष्याचा वेध घेऊन नियोजनाने जगाल तर आपली ‘आयुष्याची संध्याकाळ’ आनंदात जाईल. अन्यथा ‘अर्थ’हीन संध्याकाळ वाट्याला येईल अन् नशिबाला दोष देत जगाल!

अनिल पाटील
प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

Back to top button