पारंपरिक गुंतवणूकदारांसाठी Investors heaven कॉन्झर्वेटिव्ह हायब्रीड फंड | पुढारी

पारंपरिक गुंतवणूकदारांसाठी Investors heaven कॉन्झर्वेटिव्ह हायब्रीड फंड

भरत साळोखे : आजही भारतात बँकेच्या किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणारा वर्ग प्रचंड मोठा आहे. परंतु आजचे बँकांचे व्याजदर पाहता त्यांच्या ठेवीवर मिळणारा परतावा खूपच कमी असतो. शिवाय महागाईचा दर वगळता आणि कर पश्‍चात उत्पन्‍न पाहता तो परतावा अगदीच तुटपुंजा होतो. मग अशा गुंतवणूकदारांनी काय करावे? विशेषतः आयुष्यभर नोकरी करून ज्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे किंवा निवृत्तीच्या जवळपास जे पोहोचले आहेत, त्यांनी आपली पुंजी कुठे गुंतवावी? जेणेकरून त्या गुंतवणुकीवर मिळणार्‍या परताव्यावर त्यांना आपले निवृत्तीपश्‍चात जीवन अधिक सुकरतेने व्यतीत करता येईल? कारण शेअर मार्केटची जोखीम त्यांना नको आहे आणि उतारवयात तर त्यांना अधिक जोखीम घेण्याचा सल्‍लाही कुणी देऊ नये.

अशा लोकांसाठी investors Heaven म्हणता येईल असे गुंतवणुकीचे एक क्षेत्र आहे आणि ते म्हणजे हायब्रीड फंडाचे. हायब्रीड फंड हे इक्‍विटी आणि डेट साधनांचे मिश्रण आहे. हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. त्यांचेही सहा उपप्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे :
1) Conservative hybrid fund, 2) a) Balancded hybrid fund, b) Aggressive Hybrid fund, 3) Dynamic Asset Allocation or Balanced Advantage Fund, 4) Multi Asset Allocation Fund, 5) Arbitrage Fund, 6) Equity savings fund.

वरीलपैकी Conservative Hybrid Fund या प्रकारच्या फंडांची माहिती आपण या लेखात घेऊ. महागाईवर मात करणारे उत्पन्‍न तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून मिळवायचे असले, तर इक्‍विटीमध्ये गुंतवणूक तुम्हाला करावीच लागेल. शिवाय बँकांमधील मुदतबंद ठेवींमधून मिळणारे उत्पन्‍नही तुमचे एकूण उत्पन्‍न खूपच आकुंचित करून टाकते. गव्हर्नमेंट बाँडस, कार्पोरेट बाँडस, डिबेंचर्स आपल्याला समाधानकारक परतावा मिळवून देण्यास मदत करतात. परंतु शेअर्सची निवड व्याज दरातील चढ-उतारानुसार आणि क्रेडिट क्‍वालिटीनुसार बाँडसची निवड करताना भल्या भल्या फंड मॅनेजर्सचा कस लागतो. तिथे सामान्य गुंतवणूकदारांची काय कथा? शिवाय इक्‍विटीमधला धोका पत्करायचा तर तो किती प्रमाणात? या सर्व प्रश्‍नांवर हमखास तोडगा म्हणजे onservative Hybrid Fund!! सेबीच्या नियमावलीनुसार Conservative Hybrid फंडामधील किमान 75 ते कमाल 90 टक्के गुंतवणूक ही डेट साधनांमध्ये (गव्हर्नमेंट बाँडस, कॉर्पोरेट बाँडस, डिबेंचर्स) करणे बंधनकारक आहे. उर्वरित 10 ते 25 टक्के गुंतवणूक ही इक्‍विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये करता येते. डेंट साधनांमधील गुंतवणुकीला शेअर बाजारातील अनियमितता आणि जोखीम या बाबींचा धोका नसतो. शिवाय त्यापासून मिळणारा परतावाही बँक ठेवीपेक्षा अधिक असतो. याबरोबर इक्‍विटीमधील 10 ते 25 टक्के गुंतवणूक आपल्याला महागाईपेक्षा अधिक परतावा मिळवून देण्यास साहाय्य करते. म्हणजे डेट साधनामधील तुलनेने अधिक सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्‍न आणि इक्‍विटीमधील महागाईवर मात करणारे अधिक उत्पन्‍न यांचा संगम म्हणजे conservative hybrid fund!

वर जरी या प्रकारच्या फंडांना Investors Heaven असे संबोधले असले, तरी ते विशेषण सापेक्षरीत्या धरावे. कारण डेट साधनांमधील गुंतवणुकीलाही Interest Risk आणि Credit Risk ची जोखीम असतेच. विशेषतः कार्पोरेट बाँडस आणि डिबेंचर्सचे विविध क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी केलेले पतमापन पाहणे अत्यंत गरजेचे असते. कारण अधिक परतावा मिळविण्याच्या उद्देशाने फंड मॅनेजर कमी प्रतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी Conservative Hybrid फंड निवडताना त्यामधील डेट साधनांचे रेटिंग पाहावे. ते जितके AA+ च्या वरचे असेल तितका फंड अधिक सुरक्षित आणि इक्‍विटीमधील गुंतवणूक पाहताना लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जेवढी अधिक गुंतवणूक तेवढा फंड अधिक सुरक्षित. या प्रकारच्या फंडांना डेट फंडाचे Taxation लागू होते. एक वर्षाच्या आत तुम्ही गुंतवणूक काढून घेतली, तर मिळणारे उत्पन्‍न तुमच्या Income Tax slab नुसार करपात्र होते आणि 3 वर्षांच्या वरील गुंतवणुकीला 20 टक्के Indexation चा लाभ होतो. त्यामुळे या फंडामध्ये गुंतवणूक करताना तीन वर्षांपेक्षा अधिक किमान पाच वर्षांचा कालावधी ठेवावा. ज्यांना दरमहा नियमित उत्पन्‍न हवे आहे, त्यांच्यासाठी एक उत्तम Conservative Hybrid फंड निवडून त्यामध्ये एकरकमी गुंतवणूक करणे आणि SWP द्वारा (Systematic withdrawal plan) योग्य त्या प्रमाणात दरमहा उत्पन्‍न घेणे हा दीर्घकाळात अतिशय फायदेशीर ठरणारा मार्ग आहे.

डेट फंडाचे विविध प्रकार आणि त्यांची विविध साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया या गोष्टी गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे आपल्या वित्तीय सल्‍लागाराची मदत घेऊनच या प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक करावी.

योग्य प्रमाणात आणि योग्य साधनांमध्ये Asset Allocation हा यशस्वी गुंतवणुकीचा राजमार्ग आहे. हे आपल्याला माहीतच आहे. परंतु हे Asset Allocation कसे आणि कुठे करावे? म्युच्युअल फंडस् इथे आपल्याला योग्य दिशा दाखवतात. कारण म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर हे अभ्यास, गुणवत्ता, अनुभव, कौशल्य अशा सर्वच निकषांवर काळाच्या कसोटीवर उतरलेले असतात.

खालील सध्याचे आघाडीचे Conservatie Hybrid फंड्स दिलेले आहेत.

हेही वाचा

Back to top button