टीईटी घोटाळा प्रकरण : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्रे रद्द | पुढारी

टीईटी घोटाळा प्रकरण : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्रे रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्‍यान, सत्तार यांनी यादीत मुलींची नावे कोणी टाकलीत हे माहीत नसून बदनामीसाठी रचलेला कट असल्याचे म्हटले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाकडून समांतर चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्‍यात आली आहे. हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत.

परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची माहिती चाौकशीत समोर आली हाेती.  यानंतर काहींना अटक करण्यात आली. जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून अशा उमेदवारांना टीईटी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये आता सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

माझ्‍या बदनामीचा कट : अब्दुल सत्तार

आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्रे रद्द केल्याची माहिती समोर येत असताना सत्तार यांनी मात्र सत्यता पडताळण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. माझा मुलगा एलएलबीची परीक्षा देत आहे. त्याने टीईटी कधीच दिली नाही. या कारस्थानामागचा सूत्रधार कोण आहे, ही सत्यता पडताळण्याची गरज आहे. हा बदनामीसाठी रचलेला कट आहे. त्या यादीत माझ्या मुलांची नावे कोणी टाकलीत? टीईटी परीक्षेत माझ्या मुली अपात्र ठरल्या होत्या. घोटाळ्यामागचे सूत्रधार कोण आहेत हे समोर यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button