‘अबू आझमीला महाराष्ट्रातून बाहेर फेकायला पाहिजे’, छत्रपती संभाजीराजे यांचे वक्तव्य | पुढारी

'अबू आझमीला महाराष्ट्रातून बाहेर फेकायला पाहिजे', छत्रपती संभाजीराजे यांचे वक्तव्य

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा:  औरंगजेब हा चांगला माणूस होता आणि त्याचा इतिहास चुकीचा लिहिला गेला, असे बोलण्याची अबू आझमी याची हिंमत तरी कशी होते. मोगलांना महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून बाहेर काढण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले होते. आणि ही अबू आझमी सारखी माणसे महाराष्ट्रात राहतात. अशा माणसाला महाराष्ट्रातून बाहेर फेकायला पाहिजे, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. त्याला येथे राहायचे असेल तर महाराष्ट्रातील लोकांनी त्याला सांगितले पाहिजे की, शिवाजी महाराजांचे, शाहू, फुले, आंबेडकर आणि येथील संतांची नावे घेऊन राहा,असा सज्जड दमही त्यांनी यावेळी भरला.

लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेच्या मेळाव्याला ते आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. या मेळाव्याला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. विजय पाळेकर, मराठा क्रांती मोर्चा राज्याचे समन्वयक विनोद साबळे, संघटनेचे खजिनदार रवींद्र साठे, चिटणीस गुलाबराव मराठे, चिटणीस ब्रिंदा गणात्रा, संघटक रमेश पाळेकर, प्रतीक पाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ही निंदनीय व चिड आणणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी देशातील खासदारांनी संसदेत कडक कायदा करावा, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच आरोपीला कडक शासन व्हायला हवे. समाजातील कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे.

तुळजापूर येथे स्वराज्य संघटनेची स्थापना होणार असून त्याची पायाभरणी लोणावळा शहरातून झाली असल्याचे उद्गार संभाजीराजे यांनी काढले. ते म्हणाले की, मी छत्रपती घराण्याचा वारसदार असलो तरी जनतेच्या व समाजाच्या कल्याणासाठी विविध राजकीय पक्षांकडे गेलो; मात्र ज्याप्रमाणे साडेतीनशे वर्षांपूर्वी प्रस्थापितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहेलना केली तोच अनुभव मलाही अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी विस्थापितांसाठी स्वराज्याची निर्मिती केली.

त्याच पद्घतीने समाजातील विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्याचे स्वप्न मी बाळगले आहे. शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. विजय पाळेकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला प्रत्येक कामगार साथ देईल, असे अभिवचन दिले. सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले. तर, प्रास्ताविक अ‍ॅड. प्रथमेश पाळेकर यांनी केले. मेळाव्याची सुरुवात कोल्हापूर दरबारातील शाहीर डॉ. आझाद नाईकवडे यांच्या शाहिरीने झाली. यानंतर चौघाडा वादक रमेश पाचंगे यांनी उत्कृष्ट चौघडा वादन सादर केले.

Back to top button