

पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालय (ईडी) मला अटक करणार आहे. मी अटक करुन घेणार आहे मी झुकणार नाही, मी शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाताना दिली.
संजय राऊत यांना घेऊन आज संध्याकाळी ईडीचे पथक कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी राऊत यांच्या निवासस्थानावर बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोकाचा प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेत त्यांना हटवले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. आता संजय राऊत यांची पुढील चौकशी 'ईडी' कार्यालयात होणार आहे.
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी सात वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरी शोध मोहीम राबवत राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि बंधू आमदार सुनील राऊत यांची चौकशी सुरू केली.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता.
हेही वाचा :