संजय राऊत यांना घेऊन ‘ईडी’ पथक कार्यालयाकडे रवाना, शिवसैनिकांची ‘ईडी’विरोधात घोषणाबाजी | पुढारी

संजय राऊत यांना घेऊन 'ईडी' पथक कार्यालयाकडे रवाना, शिवसैनिकांची 'ईडी'विरोधात घोषणाबाजी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना घेऊन आज सायंकाळी पाचच्‍या सुमारास  ‘ईडी’चे पथक कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी राऊत यांच्‍या निवासस्‍थानावर बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्‍यांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्‍तारोकाचा प्रयत्‍न केले. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्‍यात घेत त्‍यांना हटवले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. आता संजय राऊत यांची पुढील चौकशी ‘ईडी’ कार्यालयात होणार आहे.

संजय राऊत यांना अटक करण्‍यात आलेली नाही. त्‍यांना केवळ ताब्‍यात घेतले आहे. अधिकारी त्‍यांना ‘ईडी’च्‍या कार्यालयात घेवून गेले आहेत, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.

तब्‍बल ९ तासांहून अधिक काळ चौकशी

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी सात वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली. यानंतर सलग ९ तास त्‍यांची चाैकशी करण्‍यात आली. यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्‍यात घेतले. यावेळी राऊत यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर माेठा पाेलीस बंदाेबस्‍त तैनात करण्‍यात आला हाेता.

काय आहे प्रकरण ?

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता.

प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत त्यांच्या घरी छापेमारी केली आहे. तर, मध्य आणि पश्चिम मुंबईतील काही ठिकाणी ईडीची पथके छापेमारी करत असल्याचीही माहिती मिळते.

 

Back to top button