

मोहोळ; पुढारी ऑनलाईन : गांजा लावण्याची परवानगी द्या : राज्यात सातत्याने येत असलेली नैसर्गिक संकटे आणि हमीभावाचा पार झालेला कोळसा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.
राज्यातील पालेभाज्यांसह टोमॅटोचे दर गडगडले आहेत. वांगी, टोमॅटो, कोबी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. राज्यात ही भयावह परिस्थिती असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याने थेट दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने सरकारने दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी शेतकरी असून कोणतेही पीक घेतले, तरी शासनाकडून हमी भाव मिळत नसल्याने तोट्यात शेती करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठिण झालं आहे. मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. एखाद्या कारखान्याला उस गाळपासाठी दिला, तरी त्याचे बिल लवकर मिळत नाही.
त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्याने मला माझ्या दोन एकर शेतीत गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. १५ सप्टेंबरपर्यंत परवानगी न मिळाल्यास १६ तारखेला परवानगी मिळाली, असे गृहित धरून लागवड करणार आहे. गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहिल असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?