मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोव्हॅक्सिन : भारताबाहेर जाण्यास परवानगी नसल्याने कोव्हॅक्सिन लसीची मागणी नागरिक करत नव्हते. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसीची मागणी वाढली आणि तुटवडा निर्माण झाला.
84 दिवसाने त्या लसीचा दुसरा डोस मिळू लागला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला परवानगी दिली. त्यामुळे 29 दिवसात दुसरा डोस मिळावून रेल्वे प्रवास सुरु व्हावा यासाठी नागरिकांकडून पुन्हा कोव्हॅक्सिन लसीसाठी विचारणा होऊ लागली आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट पासून रेल्वे प्रवासाची तसेच मॉल मध्ये जाऊन खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत.
सध्या उपलब्ध असलेल्या कोव्हीशिल्ड मधील दोन डोस चे अंतर किमान 84 दिवस आहे. तर कोव्हॅक्सिन लसींच्या दोन डोस मधील अंतर 28 दिवस इतके आहे.
कोव्हीशिल्ड चे दोन्ही डोस घेऊन प्रमाणपत्र घेण्यासाठी निदान 99 दिवस तर कोवॅक्सिन साठी 42 दिवस लागतात.
कोव्हीशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे डोस लवकर मिळत असल्याने लाभार्थीं कोव्हॅक्सीनसाठी प्रयत्न करत आहेत.
सुरुवातीला कोव्हीशिल्ड लसीला फार मागणी होती.
मात्र आठवड्याभरापासून कोव्हॅक्सीन लसीची मागणी वाढली असल्याचे बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ.गौतम भन्साली यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध आहे का अशी विचारणा लोकांकडून होत असल्याचे ही डॉ.भन्साली म्हणाले.
कोवॅक्सिनच्या मागणीत 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे ही त्यांनी सांगितले.
रेल्वे प्रवासासाठी तसेच मॉल मधील प्रवेशासाठी लसींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केल्यापासून लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ.राहुल घुले यांनी सांगितले.
त्यातल्या त्यात कोवॅक्सिन दोन्ही डोस कमी दिवसात घेता येणे शक्य असल्याने त्याची विचारणा होत आहे.
रेल्वे प्रवासाप्रमाणेच विमान प्रवास,इन्शुरंस,सरकारी कार्यालयातील प्रवेश आणि इतर सेवा यासाठी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक होईल असे लोकांना वाटते त्यामुळे लस घेण्याची घाई नागरिक करत आहेत.
हे ही वाचलं का?