गर्भधारणेचा विचार करताय? तर ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा | पुढारी

गर्भधारणेचा विचार करताय? तर 'या' पदार्थांचे सेवन टाळा

डॉ. रिचा जगताप

जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार करता तेव्हा तुम्ही निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. त्याकरिता आपली जीवनशैली, आहार आणि व्यायाम या काही गोष्टी गर्भधारणेत महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही जो आहार घेताय त्यातून तुम्हाला पुरेशी पोषक तत्त्वे मिळताय की नाही हे जाणून घेणे अधिक आवश्यक आहे. तसेच मद्यपान, धूम्रपानाचे असलेले सेवन टाळणे आवश्यक आहे. प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

कसा असावा आहार?

ताजी फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि बीट, शिमला मिरची यांचे सेवन करा.
अंकुरित धान्य, सोयाबीन, पनीर, डाळ, अंडी, मांसाहार अशा उच्च-प्रथिनांचा स्रोत असलेला आहार घ्यावा.
संतुलित आहार हा नैसर्गिकरीत्या सर्व प्रकारची आवश्यक जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे मिळवून देण्यास मदत करतो.
दररोज मर्यादित प्रमाणात सुक्या मेव्याचे सेवन करावे. कारण सुका मेवा हा अँटीऑक्सिडंट्स समृद्ध स्रोत आहे.

पीसीओएस, वंध्यत्व असलेल्या हायपोथायरॉईडीझमसारख्या अंतःस्रावी विकारांनी ग्रस्त रुग्णांचे वजन कमी करण्याचे सुचविले जाते. जर त्यांनी 5 टक्के वजन कमी केले तर त्यांचे स्त्रीबीजाचे चक्र योग्यरीत्या कार्य करते. या रुग्णांनी 3 मोठे आहार घेण्याऐवजी दिवसातून 5 ते 6 वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात आहार घ्यावा. दररोज 30-45 मिनिटांसाठी व्यायाम करावा आणि पुरेसे पाणी प्यावे. या रुग्णांना व्हिटॅमीन डी पूरक आहार पुरविला जातो. कारण व्हिटॅमीन डीच्या कमतरतेमुळे गेमेट्सची गुणवत्ता खराब होऊ शकते.

साखरेची पातळी सामान्य श्रेणीत आहे की नाही, याची देखील तपासणी करणे आवश्यक आहे. साखरेचे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण मिळते. साखरेचे उच्च प्रमाण हे व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित औषधोपचारांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

खाण्या-पिण्यावर पूर्णपणे बंधने न आणता मर्यादित प्रमाणात एखाद्या पदार्थाचे सेवन करण्यास हरकत नाही. आहारातून तेलाचा वापर पूर्णपणे न वगळता तेलाचा मर्यादित प्रमाणात वापर करण्यास हरकत नाही.

या पदार्थांचे सेवन टाळा

तळलेले, चरबीयुक्त आणि उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ जसे की, लाल मांस आणि चीज, तेलकट पदार्थ, लोणी, तूप, मैदा आणि साखर यांचे सेवन कमी प्रमाणात करणे फायदेशीर ठरेल. व्हाईट ब्रेडला ब्राऊन ब्रेडचा पर्याय तर व्हाईट राईसला ब्राऊन राईसचा पर्याय वापरू शकता. चपात्या बनविण्यासाठी मल्टिग्रेन पीठ वापरण्याचा प्रयत्न करा.

हे विसरू नका

रोज न चुकता व्यायाम करा. यामुळे योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) राखता येईल. व्यायामाने कॅलरीज बर्न करणे शक्य होते. आहार आणि व्यायाम हे दोन्ही घटक प्रजनन क्षमता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Back to top button