Ujjwal Nikam : २६/११ अतिरेक्यांच्या कराचीतील संभाषणावरून न्यायालयीन लढा सुरूच

अॅड. उज्ज्वल निकम यांची माहिती
Ujjwal Nikam
Ujjwal Nikampudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातील कराची येथील कंट्रोल रूमवरून नरिमन हाऊस व इतर ठिकाणच्या अतिरेक्यांना थेट सूचना दिल्या जात होत्या. या गोपनीय संभाषणाचे भक्कम पुरावे भारताकडे आहेत. या कटातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा व्हावी यासाठी आजही न्यायालयीन लढाई सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ, खासदार आणि या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे सुरू असलेल्या 'मुंबई पुस्तक महोत्सव २०२६' मध्ये गुरुवारी २६/११ हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाचकांसमोर कायदा, साहित्य आणि या ऐतिहासिक खटल्यातील पडद्यामागील कायदेशीर लढाईचे थरारक अनुभव मांडले.

Ujjwal Nikam
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी झाल्याने जखमी मंदारने पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदविला जबाब

हा हल्ला केवळ मुंबईवरील हल्ला नसून, भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा पाकिस्तानचा कट होता, असे सांगताना त्यांनी मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीची मुंबई न्यायालयातील साक्ष आणि शिकागो न्यायालयात सादर केलेले ईमेल पुरावे यांचा दाखला दिला. तसेच, २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याशी संवाद साधताना आलेले अनुभव व काही किस्सेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

या हल्ल्याच्या रात्रीचा धक्कादायक तपशील उघड करताना अॅड. निकम म्हणाले की, "२६/११ च्या दहशतवादी हल्लेखोरांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सायंकाळी ७ ते ७.३० या गर्दीच्या वेळी हल्ला करायचा होता. मात्र, ते मुंबईत रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान उशिरा पोहोचले, त्यामुळे ते नाराज होते. शिवाय, त्यांना सीएसएमटीपूर्वी रिगल सिनेमा येथे हल्ला करायचा होता, असेही त्यांनी सांगितले.

अभिनेता संजय दत्तच्या खटल्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "या खटल्यात माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. जेव्हा न्यायालयाने संजय दत्तला शिक्षा सुनावली, तेव्हा तो खूपच बिथरला होता. मात्र, मी त्याच्याजवळ जाऊन 'तू हिरो आहेस, तुझ्यासारख्या हिरोने घाबरणे योग्य नाही; तू या शिक्षेला वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतोस,' असा कानमंत्र दिला. त्यामुळे संजय दत्त न्यायालयात सावरला," असा किस्सा त्यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

Ujjwal Nikam
Pratap Sarnaik : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षांचे वाटप करणार

गुलशन कुमार हत्याकांडाबाबत ते म्हणाले की, या प्रकरणात आम्हाला अपयश आलेले नाही. यातील शूटरला शिक्षा झाली आहे, मात्र मुख्य आरोपी नदीम लंडनला पळून गेला आहे. ब्रिटिश सत्ताधारी नेहमीच आपल्याशी 'फोडा आणि राज्य करा' या नीतीने वागत आले आहेत. ज्या दिवशी नदीम भारतात येईल, त्या दिवशी त्याला या खटल्याला सामोरे जावेच लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.