

पुणे: दोन्ही हातांवर कोयत्याचे वार झाल्याने सही करणे शक्य नव्हते... हाताचा अंगठाही उमटवता येत नव्हता. मात्र, आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची कहाणी पोलिसांना सांगण्यासाठी मंदार किवळे याने चक्क उजव्या पायाच्या अंगठ्याचा ठसा देत जबाब नोंदविला. ससून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतानाचा हा प्रसंग हल्ल्याची भीषणता सांगणारा ठरला आहे.
येरवडा कारागृहाच्या भिंतीआड असतानाच त्याला आपल्या जीवाला धोका असल्याची चाहूल लागली होती. विरोधी गटाकडून ठार मारण्याची आणि बदला घेण्याची भाषा सुरू असल्याचे त्याच्या कानावर आले होते. मात्र, न्यायालयात हजेरी लावून परतताना आपल्यावर प्रत्यक्ष मृत्यूचा घाला घातला जाईल, याची त्याला कल्पनाही नसावी.
बुधवारी (दि. २५) शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर मंदार मारुती किवळे (वय ३६) याच्यावर देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्यांनी सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडण्यात आले.
या घटनेतील सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत मंदारने पोलिसांना दिलेला जबाब. हल्लेखोरांच्या कोयत्यांचे वार रोखताना त्याचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले. हातांच्या मनगटाजवळ, डोक्यावर आणि मानेवर वार झाल्याने त्याला सही करणे किंवा हाताच्या अंगठ्याचा ठसा देणेही शक्य नव्हते.
अखेर ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार सुरू असताना त्याने उजव्या पायाच्या अंगठ्याचा ठसा देऊन आपली आपबिती पोलिसांना सांगितली. जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि त्याच अवस्थेत न्यायासाठी दिलेली साक्ष या घटनेतून समोर आली आहे.