कल्याणच्या कचोरे गावात दरड कोसळली, लोखंडी खांबांमुळे पुन्हा दुर्घटना टळली | पुढारी

कल्याणच्या कचोरे गावात दरड कोसळली, लोखंडी खांबांमुळे पुन्हा दुर्घटना टळली

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसामुळे कल्याण पूर्व कचोरे गाव हनुमान नगर परिसरात पहाटे पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे.

हनुमान नगर या परिसरात मोठ्या प्रमाणत वसाहत आहे. या वसाहतीला लागून पाठीमागे डोंगर आहे. सुरक्षेच्यादृष्टीने येथील नागरिकांनी डोंगराच्या पायथ्याशी लोखंडी खांब लावले आहेत. त्यामुळे येथे घटना घडल्यानंतर कोसळलेली दरड खांबांमुळे अडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुर्घटना घडताच क्षणी एनडीआरएफचे पथक, केडीएमसी अग्निशमन दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

काही दिवसांपूर्वी सुद्धा याच ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली होती. आता पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, वारंवार दरड कोसळण्याची घटना या परिसरात घडत असून प्रशासनाने या परिसरात लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे.

Back to top button