‘ऑटोमेशन’ उद्योगांपर्यंत पोहोचायला हवे; डॉ. सारस्वत यांचे मत | पुढारी

‘ऑटोमेशन’ उद्योगांपर्यंत पोहोचायला हवे; डॉ. सारस्वत यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहचायला हवी,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणार्‍या सीफोर आयफोर (इंडस्ट्री 4.0) या लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या लॅबला डॉ. सारस्वत यांनी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी प्रशांत श्रीनिवासन, उद्योगपती राहुल किर्लोस्कर, राजेंद्र देशपांडे, कृष्णा भोजकर, एसपीपीयू रिसर्च पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम, सीफोर आयफोरचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते. सारस्वत म्हणाले, ‘भारतीय परिस्थिती लक्षात घेता किफायतशीर उपाय विकसित करण्यावर भर द्यायला हवा. डेटावर आधारित निर्णयक्षमता वाढविण्याची गरज आहे.’ या भेटीदरम्यान त्यांनी सीफोर आयफोरच्या कौशल्यविकास कार्यक्रमाचे कौतुक केले.

Back to top button