कानमंत्र आधुनिक शेतीतंत्राचा…

कानमंत्र आधुनिक शेतीतंत्राचा…
Published on
Updated on

कृषितंत्र, प्रसाद पाटील : बदलत्या काळाबरोबर आपल्या पारंपरिक पद्धतीतही बदल करणे भाग पडते. हे सूत्र शेती क्षेत्रालाही लागू आहे. त्यामुळे आता पारंपरिक पीक लागवड पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यांत्रिकीकरणाच्या पद्धतीही अवलंबल्या जात आहेत. मजुरांच्या दरात वाढ आणि त्यांच्या उपलब्धतेत घट होत असल्याने शेती पद्धतीत यांत्रिकीकरणाला पर्याय राहिलेला नाही.

पारंपरिक लागवड पद्धतीमुळे ट्रॅक्टर आणि अन्य अवजारांचा उपयोग शेतामध्ये करताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येचे समाधान शोधत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती आणि औजारे विभागाने ट्रॅक्टरवर आधारित अधिक उत्पन्न देण्याच्या दोन लागवड पद्धती विकसित केल्या आहेत. या दोन लागवड पद्धतीमुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर करणे सुलभ होईल आणि शेतकर्‍याला अधिक उत्पादन मिळेल. या पद्धतींना संयुक्त कृषी संशोधन परिषदेची मान्यताही मिळाली आहे.

शेतीच्या कामासाठी मजुरांच्या उपलब्धतेत घट होत असल्याने मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मजुरांची मोठी वानवा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न, उत्पादकता आणि खर्चाचा हिशेब जुळत नसल्याने शेेती न परवडणारी झाली आहे. या समस्येचे समाधान शेतकरी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून तर शोधू लागले आहेतच शिवाय कृषी विद्यापीठे देखील विविध शेती अवजारे आणि यंत्रे विकसित करीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही विकसित केलेली यंत्रे वापरण्यासाठी पिकांच्या लागवड तंत्रामध्ये थोडाफार बदल करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना या यंत्राचा प्रत्यक्षात वापर करताना येणार्‍या अडचणींचा विचार करूनच कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरवर आधारित दोन लागवड पद्धती यांत्रिकीकरणाच्या आधारे विकसित केल्या आहेत.

सध्याच्या प्रचलित लागवड पद्धतीमध्ये ट्रॅक्टरच्या दोन समोरील आणि दोन मागील चाकांतील रुंदी ही आंतरमशागत आणि फवारणीसाठी मोठी अडचण आहे. त्यावर तोडगा शोधत पेरणी, आंतरमशागत, तणनाशक-कीटकनाशकांची फवारणी आणि कापणी अशी कामे सुलभ होण्याचा पर्याय विद्यापीठाने शोधला. त्यामध्ये पेरणीपासून कापणीपर्यंत शेतीची सर्व कामे ट्रॅक्टरद्वारे करणे सहज शक्य होईल.
एक लागवड पद्धत 40-40-60 सेंटिमीटर असून ट्रॅक्टरच्या मागील चाकांमधील रुंदी (142 सें.मी.) कमी-जास्त न करता अवलंबली जाऊ शकते. समोरील चाकांची रुंदीसुद्धा हीच असणे आवश्यक आहे. दुसर्‍या पद्धतीत 45-45-60 सेंटिमीटर अंतर असून ट्रॅक्टरच्या चाकांतील रुंदी (195 सें. मी.) सर्वात जास्त ठेवून अवलंबली जाऊ शकते. या दोन्ही पद्धती ज्या पिकांच्या तासातील अंतर 45 सें.मी. आहे अशा पिकांच्या लागवडीस उपयुक्त आहेत. ट्रॅक्टरच्या चाकांमधील रुंदी वाढवणे जवळपास सर्वच ट्रॅक्टरमध्ये उपलब्ध असते. या दोन पद्धतींमुळे पेरणी, आंतरमशागत, तणनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी आणि कापणी योग्यरीत्या करता येऊ शकते. विकसित दोन्ही पद्धती सोयाबीन, मूग, उडीद, सूर्यफूल, ज्वारी, करडी, हरभरा आणि कापूस या पिकांसाठी योग्य आहेत. कारण, सर्व पिके बहुतांशवेळी दोन ओळीतील अंतर 45 सें.मी.मध्ये पेरली जातात.

प्रायोगिकरीत्या या यांत्रिक पद्धतीच्या वापरामुळे मूग आणि सोयाबीनच्या लागवडीमध्ये 60 ते 70 टक्के, आंतरमशागतीत 75 ते 80 टक्के मजुरांची बचत आढळून आली आहे. दोन्ही पिकांमध्ये अनुक्रमे 165 आणि 95 टक्के प्रतिहेक्टरी उत्पन्न जास्त मिळाल्याचे निष्कर्षही मांडण्यात आले आहेत. या दोन्ही लागवड पद्धतींमध्ये कोणत्याही कंपनीचे पेरणी यंत्र, टोकण यंत्र, फुल्ल स्विप असलेले कल्टिवेटर, बुम फवारणी यंत्र, रिपर यंत्र वापरले जाऊ शकते. वरील दोन्ही पद्धतींमध्ये रुंद वरंबा आणि सरी पद्धत वापरण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news