नगर : वरिष्ठ वेतनश्रेणीचा 230 शिक्षकांना लाभ | पुढारी

नगर : वरिष्ठ वेतनश्रेणीचा 230 शिक्षकांना लाभ

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक 230 शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळाला आहे. सीईओ आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता संबंधित शिक्षकांना वाढीव वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, 230 शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मार्च 2022 अखेर ज्यांची सेवा 12 वर्षे किंवा तत्सम असेल, अशा पात्र शिक्षकांचे प्रस्तावही बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

दि. 1 जानेवारी 1986 किंवा त्यानंतर 12 वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी मान्य करण्याची सुविधा राज्य सरकारने लागू केलेली आहे. त्यानुसार संबंधितांचे कामकाजाचे मूल्यमापन करून मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेस सादर केलेल्या प्रस्तावानुसार तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले आणि सेवा सातत्याचा लाभ मिळालेले गुणवत्ता वाढविण्यात योगदान दिलेल्या शिक्षक संवर्गातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठश्रेणी वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. 12 वर्षे सेवा, प्रशिक्षण पूर्ण करणारे तसेच शाळेची गुणवत्ता यासह अन्य निकष वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी असतात. मात्र, गेल्या काही कालावधीपासून वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न रखडला होता.

याविषयी शिक्षण परिषदेचे राज्याचे नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या मार्गदर्शनात प्रविण ठुबे, विकास डावखरे आदींनी आवाज उठविला होता. ठुबे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी हा प्रश्न सीईओ येरेकर यांच्यापुढे मांडला. सीईओंनीही तेवढ्याच तत्परतेने हा प्रश्न मार्गी लावला. त्यानुसार 230 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मार्च 2022 अखेर पात्र ठरणार्‍या शिक्षकांच्या वरिष्ठस्तर वेतनवाढीचे प्रस्तावही बोलाविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे संबंधित शिक्षकांचाही वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते मार्गी लागेल, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

Back to top button