शिंदे गटातील ३९ आमदारांची मंत्रिपदासाठी दावेदारी नाही : दीपक केसरकर | पुढारी

शिंदे गटातील ३९ आमदारांची मंत्रिपदासाठी दावेदारी नाही : दीपक केसरकर

पणजी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचा गट हा शिवसेना आहे. तरीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत. त्यांनी जी नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेली आहे. ती त्यांनी मागे घ्यावी. त्यांनी जर नोटीस मागे घेतली नाहीतर आम्ही कायदेशीर लढाई करण्यास तयार आहोत, असा अप्रत्यक्ष इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिला.

दोनापावला येथील सिदादी गोवा हॉटेलच्या सभागृहात आज (दि.२) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार केसरकर बोलत होते. आमच्या ३९ आमदारातील कुणीही मंत्रिपदासाठी दावेदारी केली नसल्याचेही एका प्रश्नावर बोलताना केसरकर यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेने पंचवीस वर्षे युती टिकवली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही भाजप आणि शिवसेना यांचे सरकार हवे होते, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे काही बोलले तरी आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. कारण ते आमचे अद्यापी नेते असल्याचे सांगून पुन्हा जर आमच्या गटावर कारवाई करण्याचा इशारा दिला. तर योग्य तो कायदेशीर कारवाई करण्याबाबत सल्ला घेऊन योग्य ती पावले आम्ही उचलू, असे ते म्हणाले.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री झालेला असल्यामुळे आणि शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांचे शिंदे नेते असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे पूर्णपणे गैर असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले. अद्याप आम्ही चिन्हावर दावा केलेला नाही. किंवा पक्षही सोडलेला नाही. अद्यापही आम्ही शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत. मात्र नाईलाज झाला तरच योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले टाकली जातील, असेही केसरकर म्हणाले.

शिवसेनेच्या ५५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून निवडले आहे. आणि आज त्यांच्यासोबत त्यातील ३९ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना गटनेते पदावरून दूर करता येत नाही. कायद्याने ते शक्य नसल्याचे सांगून विधानसभेमध्ये आमच्या गटाने काढलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना मान्य करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा आमचा गट हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि हिंदुत्वाच्या विचारासाठी एकत्र आलेला आहे. शिंदे हे राज्याचे आता कुटुंबप्रमुख झाले आहेत. त्यामुळे कुटुंब प्रमुखाच्या विरोधात नोटीस काढणे पूर्णपणे गैर असल्याचे केसरकर म्हणाले.

शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून प्रतिज्ञापत्र घेणे चुकीचे असल्याचे सांगून कार्यकर्ता प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतरही इतर पक्षात जाऊ शकतो. त्या प्रतिज्ञापत्रकाला कायदेशीर आधार नाही. असे सांगून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे शिवबंधन हेच प्रतिज्ञापत्र असते आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ते शिवसैनिकांवर विश्वास ठेवून बांधीले होते, असे सांगून आज संध्याकाळी किंवा रात्री आम्ही मुंबईला निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सभागृहाचे नेते सध्या एकनाथ शिंदे आहेत आणि सभागृहाच्या नेत्याच्या विरोधात नोटीस काढणे हे पूर्णपणे गैरसमजाचे आहे असे सांगून शिंदे यांना ५५ आमदारांनी गट नेता निवडलेला आहे. याची जाणीव शिवसेनेने ठेवावी. असे केसरकर म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button