Eknath Shinde : राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार : एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde : राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा आज जयंती दिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी आज (दि. १) व्यक्त केला. ते पणजी येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते (Eknath Shinde) म्हणाले की, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये, म्हणून सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात येतील. राज्यातील जलयुक्त शिवार योजना, मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. जलसिंचनाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवला जाईल, असेही ते म्हणाले.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिलेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्याकडे १७० च्या आसपास बहुमतचा आकडा आहे. त्यामुळे बहुमत चाचणीची कोणतीही चिंता वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उर्वरित आमदार उद्या मुंबईत येणार आहेत. राज्यपालांनी ३-४ जुलै रोजी अधिवेशन बोलावले आहे. आमचे १७० आमदार आहेत आणि वाढत आहोत. विधानसभेत आमच्याकडे सहज बहुमत आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button