Sharad Pawar : मला एक प्रेमपत्र आलं आहे : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : मला एक प्रेमपत्र आलं आहे : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने गुरूवारी नोटीस बजावली आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान, विरोधी विचारांच्या लोकांवर ईडीचा गैरवापर केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त करत मला एक आयकर विभागाचे प्रेमपत्र आल्याचे सांगत त्या पत्राची खिल्ली उडवली आहे.

याबाबत पवार (Sharad Pawar)  यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००९ साली देखील मी लोकसभेला उभा होतो, २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो, तसेच २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे. सुदैवाने त्याची सर्व माहिती माझ्याकडे व्यवस्थित ठेवलेली आहे.

या यंत्रणेचा उपयोग राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांच्या लोकांसाठी केला जातो. माझ्याकडे इन्कम टॅक्सच्या वतीने असेच एक प्रेमपत्र आले आहे. २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती. त्याची चौकशी आता करत आहेत.
ईडी आणि केंद्रीय यंत्रणांची मदत हल्ली घेतली जाते, त्याचे परिणाम दिसतात. अनेक विधानसभेचे सदस्य चौकशीच्या नोटीसा आल्याचे सांगतात. ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. पाच वर्षापूर्वी ईडी हे नाव देखील आम्हाला माहीत नव्हते. आज तर गावखेड्यात देखील लोक गमतीने तुझ्या मागे ईडी लागेल, असे म्हणतात, असा खोचक टोला पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button