आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आमदारांनी घेतली शपथ | पुढारी

आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आमदारांनी घेतली शपथ

पणजी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी_दिन म्हणून साजरा केला जातो. शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या उपस्थितीत आज दिवंगत वसंतराव नाईक यांना विनम्रतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषिदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार केला. तर पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी याबबातची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी महाराष्ट्राला आत्महत्यामुक्त बनविण्याची शपथही घेतली.

केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील ४९ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. एकनाथ शिंदे हेदेखील शेतकरी कुटुंबातून आले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे, म्हणूनच हा निर्धार करण्यात आला. तर शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी करून उपयोग नाही. त्यासाठी त्यांना मदतीचा आधार देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

ती चूक परत होणार नाही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पणजीत असणाऱ्या आमदारांनी जल्लोष केला होता. यावर समाज माध्यमातून खूपच टीका झाली. याबाबत केसरकर म्हणाले की, आनंद झाल्यावर तो साजरा करणे हे साहजिकच आहे. मात्र, यापुढे महाराष्ट्राचे नाव बदनाम होईल असे कोणतेही कृत्य आमदारांकडून होणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही आमदारांना तशा सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री मुंबईला रवाना

केसरकर यांनी पुढे सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मुंबईला रवाना होणार आहेत. तिथे ते आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आम्ही इथे पर्यटन करायला आलेलो नाही, हाच संदेश आम्हाला विरोधकांना द्यायचा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button