हंगाम लांबल्याने गावरान आंब्यांना तिप्पट भाव; प्रतिडझनास 20 ते 350 रुपये भाव | पुढारी

हंगाम लांबल्याने गावरान आंब्यांना तिप्पट भाव; प्रतिडझनास 20 ते 350 रुपये भाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने गावरान आंब्याचा हंगाम लांबला आहे. बाजारात गावरान आंब्याची आवक व मागणीही चांगली आहे. मागणी अधिक असल्याने एरवी 10 ते 40 रुपये प्रतिडझन मिळणारा आंबा आता 20 ते 350 रुपये डझनापर्यंत पोहोचला आहे. गोड, रसाळ आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला गावरान आंबा भोर, वेल्हा व मुळशी भागातून दाखल होत आहे. रविवारी (दि. 26) गावरानची 50 ते 60 डाग, पायरीची 30 ते 40 डाग, रायवळची 70 ते 80 डाग आणि गोटी आंब्याची 30 ते 40 डाग आवक झाली. एका डागामध्ये साधारणपणे 7 डझन आंबे असतात. तयार गावरान आंब्यास डझनास 300 ते 350 रुपये भाव मिळाला.

नेहमीचा विचार केल्यास जूनच्या अखेरच्या टप्प्यात गावरानला 100 रुपये भाव मिळत असतो. मात्र, या वर्षी तिप्पट मिळत आहे. तिच परिस्थिती पायरी, रायवळ आणि गोटीची आहे. तिन्ही आंब्याला डझनास सध्या अनुक्रमे 150 ते 200 रुपये, 50 ते 150 रुपये आणि 20 ते 30 रुपये भाव मिळत आहे. रत्नागिरी हापूसचा हंगाम संपला आहे. त्यानंतर नागरिक गावरान आंब्याचे सेवन करीत असतात. दर वर्षी जूनअखेरलाच हा हंगाम संपलेला असतो. मात्र, लांबलेल्या पावसामुळे 8 ते 10 जुलैपर्यंत आंब्याची आवक सुरू राहण्याचा अंदाज व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला.

पाऊस लांबल्याने या आंब्याचा हंगाम आठ ते दहा दिवस लांबला आहे. ग्राहकांकडून आंब्याला मागणी असून, नेहमीच्या तुलनेत आंब्याला तिप्पट भाव मिळत आहे.

                                                       – यशवंत कोंडे, गावरान आंबा व्यापारी

कोरोनामुळे मागील दोन वर्षे गावरान आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, यंदा मालाला चांगली मागणी आहे. भावही चांगला मिळत आहे. बाजारात 6 डाग आंबे विक्रीसाठी आणले होते. मिळालेला भाव समाधानकारक आहे.

                                             – शुभम गुजर, शेतकरी, गुजरवाडी, ता. मुळशी

Back to top button