अजित पवारांविरोधात बंडखोरांची नाराजी | पुढारी

अजित पवारांविरोधात बंडखोरांची नाराजी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शिवसेना आमदारांची नाराजी प्रकर्षाने उघड झाली असून वित्त खाते हातात असल्याने अजित पवार यांनी कशी गळचेपी केली हे बंडखोर सांगत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक केलेले आमदार भरत गोगावले हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनीही आपली नाराजी स्पष्ट केली आहे.

2019 च्या वेळी पराभूत झालेल्या शिवसेना आमदारांची गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब यांनी कधी साधी बैठक तरी घेतली का? असा सवाल करून गोगावले म्हणाले, उलटपक्षी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत होते, ताकद देत होते. एकूणच शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथजी शिंदेंनी आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला. आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथजी शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे, अशी भूमिका गोगावले यांनी घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसविषयी नाराजी प्रकट केली आहे.
आम्ही गेली 30 वर्षे प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्धच लढाई आहे. या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती केली की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद मिळाली नाही.

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्या विषयी खदखद व्यक्‍त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला जात होता, हेच माजी आमदार भविष्यात आमदार होणार, अशा गर्जना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून केल्या जात होत्या. राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्ही सर्व आमदारांनी वारंवार मुख्यमंत्र्यांना तक्रारी केल्या. पण काहीच उपयोग झाला नाही, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

अजित पवार हे ग्रामविकास खात्याच्या पंचवीस पंधरा या लेखाशीर्षच्या माध्यमातून ग्रामीण भागात देण्यात येणारा निधी हा आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना देत होते. शिवसेना आमदारांसमोर राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवारांना ताकद देत होते, असा आक्षेपही बंडखोरांचा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेना आमदारांच्या बंडानंतर या बंडाला अजित पवार हे देखील कारणीभूत असल्याचे म्हटले होते. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या घेतलेल्या बैठकीतही प्रामुख्याने अजित पवार यांच्या विषयीच नाराजी उफाळून आली होती.

Back to top button