पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे, की त्यांच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात,' असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित 'कर्मयोगी नमो' लघुपट स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मानसी मागीकर, अभिनेते आरोह वेलणकर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पाटील म्हणाले, की कोविड आणि त्यानंतरच्या काळातील पंतप्रधान मोदींच्या अनेक निर्णयांमुळे देशाचा संपूर्ण जगात नावलौकिक वाढला.
कोविडनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधनटंचाईचा सामना करावा लागला. त्यातून आपल्या शेजारील पाकिस्तानसह अनेक देशांचे अर्थचक्र कोलमडले. पण, मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे देशवासीयांना इंधनटंचाई किंवा महागाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत. गोखले म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे देशाला सापडलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. उमेश घळसासी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
'दोन कप चहा'ला प्रथम पुरस्कार
'कर्मयोगी नमो' लघुपट स्पर्धेत 135 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी अमरावतीच्या संज्ञा मीडिया प्रकाशन, रंगशाळा निर्मित आणि धनंजय कानबाळे दिग्दर्शित राष्ट्रीय संरक्षणावर आधारित 'दोन कप चहा' या लघुपटास प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, पनवेलच्या सत्यधर्मा प्रोडक्शनच्या स्वच्छ भारत विषयावरील 'सेल्फी पॉइंट' लघुपटाला द्वितीय आणि मुंबईच्या यामिनी पटेल दिग्दर्शित 'अक्षरण मोदी' या लघुपटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा