शरद पवारांचे बंडखोर आमदारांबाबत मोठे विधान, “आमदार मुंबईत परतल्‍यानंतर…” | पुढारी

शरद पवारांचे बंडखोर आमदारांबाबत मोठे विधान, "आमदार मुंबईत परतल्‍यानंतर..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ;
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्‍या बंडानंतर राज्‍यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहाेचला आहे. आता राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सेनेच्‍या बंडखाेर आमदारांबाबत मोठे विधान केले आहे. आज दिल्‍लीमध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्‍हणाले की, बंडखोर आमदारांचे गट हा आसाममध्‍ये गेला आहे. त्‍यांना सत्ता परिर्वतन हवे आहे. शिवसेनेची ही खात्री आहे की, गेलेले सर्व आमदार परत येतील. बंडखोर आमदार मुंबईत परत आल्‍यानंतर त्‍यांच्‍या भूमिकेत बद्‍दल होईल. या सत्तासंघर्षात अखेर उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल ”

या वेळी शरद पवार म्‍हणाले की, “मला माहिती असणारी शिवसैनिक वेगळी आहे. काही आमदारांनी घेतलेल्‍या भूमिकेमुळे शिवसेना संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण शिवसैनिक ही संघटनेची ताकद असून, राज्‍यात त्‍याचे जाळे पसरले आहे. त्‍यामुळे बंडखोर आमदारांच्‍या भूमिकेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

काँग्रेस- राष्‍ट्रवादीचा शिवसेनेच्‍या नेतृत्‍वाला पाठिंबा

राष्‍ट्रवादी असो की, काँग्रेस आमचा शिवसेनेच्‍या नेतृत्‍वाला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे व त्‍यांच्‍याबरोबर गेलेल्‍यांनी नवीन गट स्‍थापन करण्‍याची घोषणा केली आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्‍या महाविकास आघाडी सरकारचा शिवसेनेच्‍या नेतृत्‍वाला पाठिंबा आहे. आज आमची आघाडी आहे आणि ती कायम ठेवण्‍याची इच्‍छा आहे, असेही पवार यांनी स्‍पष्‍ट केले.

संख्‍याबळ आहे तर मुंबईत या

काही तरी आमिष दाखवून एकनाथ शिंदे व शिवसेनेच्‍या आमदारांना गुवाहाटीला नेण्‍यात आले आहे. बंडखोरांना वेगळी आश्‍वासन दिली असावीत, अशी शंका लोकांना येते. आता एकनाथ शिंदे म्‍हणतात की, त्‍यांच्‍याकडे आमदारांचे समर्थन आहे. त्‍यांच्‍याकडे पुरसे संख्‍याबळ असेल तर त्‍यांनी मुंबई यावे. राज्‍यपालांना भेटावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

बंडखोरांवरील कारवाईचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील

एकनाथ शिंदे हे अडीच वर्ष महाविकास आघाडीतच होते. त्‍यांना आताच कशी काय हिंदुत्त्‍वाची आठवण झाली, तसेच राष्‍ट्रपती राजवट आली तर बंडाला अर्थ काय, भाजपने एवढे केले याचा काय फायदा, असा खोचक सवालही त्‍यांनी यावेळी केले. शिंदे यांनी एका राष्‍ट्रीय पक्षांचे समर्थन असल्‍याचे म्‍हटलं होते. यामध्‍ये काँग्रेस, माकप, बसपा, तृणमूल आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांचा भाजपला पाठिंबा नाही;मग एकनाथ शिंदे यांना मदत करायला भाजपच उतरतो. मात्र आम्‍ही शिवसेनेशी बांधील. आम्‍ही यावर ठाम आहोत. महाविकास आघाडीच्‍या वतीनेच बंडखोर आमदारांवर कारवाईसाठी विधासनभा अध्‍यक्षांकडे विनंती केली जाईल. बंडखोरांवर काय कारवाई करावी, याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

तीन महिन्‍यात मविआ सरकार पडेल असा भाकित केले हाेते

महाविकास आघाडी सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर हे सरकार तीन महिन्‍यात कोसळले, असे भाकित काहींनी केले होते. मात्र ते खोटे ठरले. आज अडीच वर्ष झाली तरी सरकार कायम आहे. या पुढेही मविआ सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वासही पवार यांनी व्‍यक्‍त केला. उद्‍या राष्‍ट्रपती पदाच्‍या निवडणुकीसाठी यशवंत सिन्‍हा यांचा अर्ज दाखल करणार आहेत. आम्‍ही यशंवत सिन्‍हा यांच्‍या पाठिशी आहेत, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button