

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटीरतावादी लोक शिवसेनेत नकोत. त्यांना आता माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे स्पषट करत बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १५ ते १६ आमदार संपर्कात आहेत, असा दावा युवासेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि.२६) येथे केला. ते सांताक्रुझ येथील युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. याबाबत त्यांना मे महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली होती. परंतु, जे व्हायचे ते २० जूनला झाले. आणि त्यांनी बंडखोरी केली.आमदारांना फरपटत सुरतला नेले. पण महाराष्ट्रात घाण साचून नये म्हणून पर्यावऱण मंत्री म्हणून काम करत आहे. आता शिवसेनेतून घाण गेल्याचा आनंद आहे.
बंडखोर आमदारांना सुरत आणि गुवाहटी येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांचा खर्च कोण करत आहे. त्यांना सुरक्षा पुरवली जात आहे, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बंडखोरांमध्ये महाराष्ट्रात राहण्याची हिंमत नाही. म्हणून ते सुरतेला पळाले. पण ज्यांना यायचे आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत.
महाराष्ट्रातून आमदारांना फरफटून नेले आहे. त्यांचा हॉटेलमधील जेवण्याचा खाण्याचा पिण्याचा कपड्यांचा खर्च किती असेल, असा सवाल करत त्यांच्यामागे केंद्रातील शक्ती पाठिशी आहे, असा आरोप ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केला. बंडखोर आमदार आता आम्हीच बाळासाहेब आहोत, असू म्हणू लागले आहेत. आम्हीच बाळासाहेब म्हणता आणि सुरतेमध्ये पळता. परंतु शिवसेनेचे नाव घ्यायला आता त्यांची लायकी नाही.
हेही वाचलंत का ?