एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढली, थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र | पुढारी

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढली, थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

मुंबई; पुढारी ऑनलाईन : १६ आमदारांच्या निवासस्थानाची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतल्याप्रकरणी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्राची डीजीपी रजनीश सेठ आणि राज्यातील सर्व पोलिय आयुक्तांना पत्र पाठवले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. आमदारांची व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

विद्यमान आमदारांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रोटोकॉलनुसार देण्यात आलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. राजकीय बदला घेण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. प्रोटोकॉलनुसार देण्यात आलेली सुरक्षा तातडीने पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जर का आमदारांच्या कुटुंबियांना काही इजा झाल्यास त्याला मुख्यमंत्री, महाविकास आघाडीतील नेते शरद पवार, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रासोबत १६ आमदारांची यादी जोडली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, भरत गोगावले, संजय शिरसाठ, महेश शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान, यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, परभणीत शिवसैनिकांनी निदर्शने केली आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मातोश्रीवर शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. यात उभय नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या बंडाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरले असल्याचे समजते.

शिवसेना फोडण्याचे आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल. त्यामुळे हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी हिमतीने उभे राहा. आमदार फुटले असतील तरी त्यांना परत आणण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हीही सक्रिय व्हा आणि शिवसैनिकांनाही सक्रिय करा, असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

Back to top button