पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडामुळे अस्थिर झालेल्या महाविकास आघाडीचे पुढे काय होणार याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असताना खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर आज (दि.२४) मोठे स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असून बहुमतासाठीचा आवश्यक आकडा पूर्ण झाला आहे, असे राऊत म्हणाले आहेत. आता ही कायदेशीर लढाई असून शिवसेनेतून जाणाऱ्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी केले.
काल (दि.२३) नारायण राणेंनी ट्विटमधून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना धमकीवजा संदेश दिला होता. याला उत्तर देताना राऊत म्हणाले, शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली असून हे राजकीय संस्कृतीत योग्य नाही. फक्त सत्ता मिळवण्यासाठी काहीही बोलणे योग्य नसून अशा प्रकारचे वक्त्यव्य एका जेष्ठ नेत्यांबाबतीत करणे ही महाराष्ट्राची रीत नसल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी एक ट्विटदेखील केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.