फडणवीस या फंद्यात पडू नका नाही तर पहाटेचा शपथविधी संध्याकाळी होईल, संजय राऊतांचा इशारा | पुढारी

फडणवीस या फंद्यात पडू नका नाही तर पहाटेचा शपथविधी संध्याकाळी होईल, संजय राऊतांचा इशारा

मुंबई : पुढारी ऑनलाईन : देवेंद्र फडणवीस तुम्ही या फंद्यात पडू नका, आमचा आम्ही बघून घेतो. स्वत:ची उरलीसुरलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे, त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, कार्यकारिणीच्या बैठकीत आहे. बैठकीत पक्षाच्या विस्तार, भविष्याविषयी विचार करू. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी मोठे निर्णय घेणार आहे. राजकारणाला दिशा देणारी आजची कार्यकारिणीची बैठक आहे.

शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिलंय. शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, हजारो शिवसैनिक माझ्या मागे आहेत, म्हणून मी उभा आहे. आजही उद्धव ठाकरेंच्या मागे हजारो सैनिक आहेत. पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. पैसा आहे म्हणून कुणीही काहीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

राऊत म्हणाले, बंडखोरांनी पलायन केलं आहे. त्यांना जी सुरक्षा आहे, ती आमदार म्हणून आहे. ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेच जबाबदारी आमची नाही. वाघ म्हणवता मग बकरीसारखे का वागता? राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असाही हल्लाबोल राऊतांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिशी आहे. शिवसेनेचा अजून विसेफोट झालेला नाही. पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहेत. पक्षात अनेक नियुक्त्या केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

शिवसैनिकांना संयम राखण्याच्या सूचना राऊत यांनी यावेळी दिल्या.

Back to top button