फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री! बंडखोर आमदारांनी गुपित फोडले | पुढारी

फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री! बंडखोर आमदारांनी गुपित फोडले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  ‘आमचं सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार’, असे गुपित सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी फोडले आहे. त्यांची ही क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन करून आपण कुठे आहात, अशी विचारणा केली असता शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहाटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करू नका, असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळे कुणाला फोन केला नाही, असे त्यांनी कार्यकर्त्याला समजावून सांगितले.

एकनाथ शिंदे न बोलता रिझल्ट देणारा माणूस

एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत. पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खूप आवडले आहे. आपली ओळख नाही पाळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपूस केल्याचे पाटील यांनी सांगितले. तुम्ही गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तुम्ही काही पण काम सांगा, असे शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे तर देव माणूस

एकही आमदार उद्धव साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहेत, असेही सांगायला शहाजी पाटील विसरले नाहीत. गेल्या अडीच वर्षांत सांगोला उपसा सिंचन योजनेला आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशा मागणीची बारा पत्रे उद्धव ठाकरे यांना दिली असतानाही त्यांनी नाव काही दिले नाही, अशी नाराजी शहाजी पाटील यांनी व्यक्‍त केली. तसेच अजित पवार यांनी निधी देताना कसा अन्याय केला हे देखील त्यांनी या संभाषणात सांगितले आहे. शिंदे यांच्या गटामध्ये शंभूराज देसाई आणि मी पहिल्यांदा गेलो. मग बाकीचे आमदार आले, असाही खुलासा पाटील यांनी केला आहे.

Back to top button