पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे मोठे नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली. शिंदे हे आपले ४० समर्थक आमदार घेऊन गुजरातमधील सूरतला गेले होते. तेथून ते आज गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. इथेच बसून शिवसेनेसोबत तह करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. हा त्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे येणारे काही तास सांगणार आहेत. पण ही बोलणी यशस्वी झाली नाही तर ते शिवसेनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आणि हेच शिवसेना पक्षातील आजवरचे सर्वात मोठे बंड ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यापासूनचे पहिलेच बंड आहे. हे बंड ते कसं शांत करतात हे पाहणंदेखील महत्वाचं ठरणार आहे.
आपण जर आजवर झालेल्या बंडखोरीची माहिती घेतल्यास शिवसेनेला १९९१ पासून पक्षीय बंडाचा इतिहास आहे. १९९१ साली सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या विरोधात बंड केले होते. छगन भुजबळ आपल्यासोबत ९ आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले होते. यानंतर १९९८ मध्ये माजी मंत्री गणेश नाईक, गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंड केले होते. परंतु काही दिवसांनी हे बंड शांत झाले. हे सर्व बंड पक्षात झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. बाळासाहेबांचा झंझावात आणि करिष्मा दाखवणारे नेतृत्व असल्यामुळे शिवसेनेला त्याची फार झळ बसली नाही. बाळासाहेबांनी जाणाऱ्यांच्या बंडखोरांविषयी कधी चिंता केली नाही. पण सध्या तशी परिस्थिती नाही.
आता शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. उद्धव ठाकरे हे शांत आणि संयमी असे आहेत. ते सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच आमदार, खासदारांपेक्षा पक्षीय काम करणाऱ्या लोकांना उद्धव यांनी कायम महत्त्वाचे स्थान दिले. मुंबईतील राजकारणात विभाग प्रमुख आणि राज्यातील राजकारणात जिल्हा प्रमुखांच्या शब्दाचा उद्धव ठाकरे यांनी नेहमीच आदर केला. महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांमधील तिकीट वाटपात विभाग प्रमुख आणि विधानसभेसाठी जिल्हाप्रमुखांशी चर्चेनंतरच उद्धव ठाकरे उमेदवार निश्चित करतात. याशिवाय पक्षात नेत्यांची नवी पिढी तयार करतानाही त्यांनी बाळासाहेबांच्या काळातील नेत्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले. त्यामुळेच सुभाष देसाई, दिवाकर रावते ही फळी अजूनही कार्यरत असण्याचे हेच कारण आहे. या गोष्टींमुळे उद्धव यांची पक्षावरील पकड कधी सैलही झाली नाही आणि मोठमोठ्या आव्हानांमध्येही शिवसेना टिकून वाढत राहिली.
अनेकवेळा त्यांच्या राजकीय कुवतीबद्दल शंका घेतली गेली. परंतु त्यांनी प्रत्येकवेळी आपली क्षमता सिद्ध केली आहे. परंतु ते पक्ष प्रमुख झाल्यापासून त्यांना बंडखोरी सारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागले नाही. त्यांच्या नेतृत्वाची कसोटी म्हणावी तशी पाहायला मिळाली नव्हती. प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने ठाकरे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांना एकाच वेळी स्वतःचे मुख्यमंत्री पद आणि पक्ष वाचवायचा आहे. तसेच त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाची धारही कायम ठेवायची आहे.
शिंदे यांचे बंड शमवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी आपले विश्वासू सहकारी आणि संकटमोचक मिलिंद नार्वेकर यांची नेमणूक केली आहे. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांना अनेक आमदारांचा पाठिंबा आहे, असे प्रथमदर्शनी सर्वांना वाटत असले, तरीही भविष्यात या बंडखोर आमदारांना पोट निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. मुळात पोट निवडणुकीला सामोरे जाण्याची आणि शिवसेना पक्षातून बाहेर पडून नव्याने सुरुवात करण्याची किती जणांची तयारी आहे? त्यातही निवडून येण्याची किती जणांची क्षमता आहे? अशी सद्यस्थितीची जाणीव उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारांना करून देण्यात येऊ शकते.
भाजपची ही खेळी नेमकी काय आहे आणि त्यातून आमदारांच्या हातात काहीच कसे पडणार नाही, याबाबतही ठाकरे हे नार्वेकर यांच्या माध्यमातून आमदारांना समजावून सांगितले जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काही तासांमध्ये उद्धव ठाकरे हे पक्षातील गुंता सोडवण्यात यशस्वी होतात की नाही आपल्याला कळणार आहे.
हे ही वाचा :