‘शिवसेनेत मला किंमत नाही’; एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला होता फोन!

‘शिवसेनेत मला किंमत नाही’; एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला होता फोन!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही, आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना फोनवर सुनावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांनी आपला फोन बंद करून ते सुरतकडे निघाले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना लोअर परेल येथील सेंट रेगीस या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ठेवले आहे.

शिंदे हे आघाडी सरकारच्या स्थापनेपासून नाराज होते. त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन शिवसेनेच्या नेतृत्वाने दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री बनले. काल सायंकाळी शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तेव्हा आपण शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल नाराज आहोत. आपल्याला महत्वाचे निर्णय घेताना डावलले जात आहे, असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन बंद ठेवला आहे.

शिंदे यांच्या बंडाची कल्पना काल संध्याकाळी आली. त्यांनी शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि आमदार फाटक यांना वर्षावर बोलावून घेतले. तेथून शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान, शिवसेनेच्या इतर आमदारांना सेंट रेगीस हॉटेलमध्ये हलविले.

दोन दिवसांपासून शिंदे यांनी रणनिती आखली होती. त्यांनी ठाण्यातील नगरसेवकांना कल्पना दिली होती. शिंदे यांच्या सोबत सुरतला बालाजी किणीकर, अंबरनाथ, विश्वनाथ भोईर कल्याण, महेंद्र थोरवे कर्जत, भरत गोगावले महाड, शहाजी पाटील, सांगोला यांच्यासह संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे आदी आमदार असल्याचे कळते.

सेनेचे 'हे' आमदार आहेत नॉटरिचेबल

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी जवळपास पंधरा आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सध्या संजय रायमुलकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, महेंद्र दळवी, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, प्रदीप जयस्वाल या शिवसेना आमदारांचे फोन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये किती आमदार उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news