विधान परिषद निवडणूक : राजकीय पटावर फडणवीसच वजीर | पुढारी

विधान परिषद निवडणूक : राजकीय पटावर फडणवीसच वजीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीतही पुरेसे संख्याबळ नसतानाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पाच उमेदवारांना निवडून आणून सत्तारूढ महाविकास आघाडीत बिघाडी केली. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांबरोबर फडणवीस यांनी, शिवसेना आणि काँग्रेसची 21 मते फोडली असून, राज्यातील ठाकरे सरकारला काठावरच्या बहुमतावर आणून ठेवले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत डावपेच यशस्वी होणार नाहीत, असे छातीठोकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत होते; पण विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्तारूढ शिवसेना, काँग्रेस यांच्यासह आघाडी समर्थक छोटे पक्ष व अपक्ष यांची 21 मते फोडण्याची किमया फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवेळीच विधान परिषदेच्या निवडणुकीची व्यूहरचना केली होती. त्यामुळे वेस्ट इन आणि फोर सिझन या पंचतारांकित हॉटेलमध्ये खडा पहारा असतानाही शिवसेना आणि काँग्रेसला त्यांनी खिंडार पाडले. फडणवीस हे कुठेही कोणत्याही आमदाराला भेटले नाहीत; पण त्यांचा गनिमी कावा मुख्यमंत्र्यांना कळला नाही. आघाडीचे नेते केवळ कागदावर गणिते मांडत बसले.

आपल्याकडील अतिरिक्त मते देत असल्याचे सांगत बसले; पण फडणवीस यांनी आधीच सुरुंग पेरले होते. ते आघाडीच्या नेत्यांना कळले नाही. फडणवीस यांनी आघाडीतील अडीच वर्षांतील ढिसाळ कारभारामुळे नाराज असलेल्या आमदारांच्या संतापावर फुंकर मारली; पण याचा इतका मोठा भडका आघाडीत उडेल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटले नाही.

राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेली 123 मते कायम ठेवताना, 11 मते आणखी आघाडीची खेचली. भाजपकडे 106 आणि त्यांचे समर्थक अपक्ष 6 तसेच मनसेचे एक अशी 113 मते असताना, त्यांनी विधान परिषदेच्या गुप्त मतदानात 133 मते भाजपच्या पाच उमेदवारांनी मिळवली. याचा अर्थ 21 मते फडणवीस यांनी आघाडीची फोडली.
आघाडीच्या सहा उमेदवारांना 151 मते पडली आहेत. बहुमताचा जादुई आकडा 145 आहे. त्यामुळे 170 चे बहुमत असलेल्या आघाडीला फडणवीस यांनी 155 वर आणले.

फडणवीस यांनी गुप्तपणे आपल्या टीमला कामाला लावले. अंतर्गत कलहातून आघाडी सरकार पडेल, असे फडणवीस पहिल्या दिवसापासून सांगत होते. तसेच या निवडणुकीत घडले. मुख्यमंत्र्यांनी काल शिवसेनेत कोणी गद्दार नाही, असे सांगितले; पण अवघ्या 24 तासांत फडणवीस यांनी शिवसेनेचा पत्त्याचा किल्ला पाडला. त्याबरोबर काँग्रेसच्या आमदारांची मते फोडली आहेत. फडणवीस हेच बुद्धिबळाच्या पटावरील खरे वजीर
ठरले आहेत.

3 पैकी 3 आणि आता 5 पैकी 5! राज्यसभा असो की विधान परिषद विजेता फक्‍त भाजपच… जय महाराष्ट्र! असे ट्विट करीत फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

मुंबई : विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकून घरी परतलेल्या आपल्या कर्तृत्ववान पुत्राचे औक्षण करताना श्रीमती सरिता फडणवीस. शेजारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच आमदार गिरीश महाजन आदी.

Back to top button