IAF Agnipath scheme : ‘अग्निपथ’साठी हवाई दलाचा भरती प्लॅन जाहीर; अग्निवीरांना मिळणार ‘या’ सुविधा | पुढारी

IAF Agnipath scheme : ‘अग्निपथ’साठी हवाई दलाचा भरती प्लॅन जाहीर; अग्निवीरांना मिळणार ‘या’ सुविधा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारच्या बहुचर्चित अग्निपथ योजनेअंतर्गत पद भरती जारी केली आहे. वायुसेनेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीबाबत माहिती दिली आहे. यात अग्निवीरांसाठी वयोमर्यादा १७.५ वर्षांपासून ते २१ वर्षे ठेवण्यात आली आहे. चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून कायमस्वरुपी असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांनुसारचं सुविधा मिळणार आहेत. (IAF Agnipath scheme)

प्रशिक्षण कालावधीत अग्निवीरांना शासकीय आरोग्य सेवा मिळणार आहे. तथापि, विशेष परिस्थिती वगळता त्यांना प्रशिक्षण सुरू असताना मध्येच राजीनामा देता येणार नाही. या योजनेंतर्गत, अग्नीवीरांना पहिल्या वर्षासाठी पगार म्हणून ३० हजार रुपये मिळतील, त्यापैकी २१ हजार थेट त्यांच्या बँक खात्यात आणि ९ हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडात जमा केले जातील. दरवर्षी वेतनात वाढ होईल. प्रशिक्षणाच्या शेवटच्या वर्षात अग्निवीरचा पगार ४० हजार रुपये असेल. तसेच वेतनासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळणार आहेत. (IAF Agnipath scheme)

चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ७५ टक्के अग्निवीर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना सेवा निधीअंतर्गत १० लाख चार हजार रुपये दिले जातील. यातील पाच लाख दोन हजार रुपये हे त्यांनी स्वत: कमावलेले असतील. याशिवाय अग्नीवीरांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची ग्रॅच्युइटी किंवा अन्य निधी मिळणार नाही. मात्र, त्यांना प्रशिक्षण कालावधीत ४८ लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. (IAF Agnipath scheme)

हवाई दलात अग्निवीरांना वेगळी रँक दिली जाईल, जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल. अग्निपथ योजनेच्या सर्व अटींचे अग्निवीरांना पालन करावे लागेल. वायुसेनेत नियुक्तीच्या वेळी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अग्निवीरांना त्यांच्या पालकांची स्वाक्षरी असलेले नो ऑब्जेक़्शन लेटर घ्यावे लागेल. चार वर्षांच्या सेवेनंतर २५ टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये रुजू करून घेतले जाईल. या २५ टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. (IAF Agnipath scheme)

हवाई दलाने पुढील प्रमाणे माहिती प्रसिद्ध केली आहे…

  • अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीरची भरती चार वर्षांसाठी केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयाच्या भारतीय नागरिक असणारे अर्ज करू शकतात.
  • शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेबाबत हवाई दल लवकरच माहिती प्रसिद्ध करेल.
  • निवड झालेल्या उमेदवाराला दरवर्षी ३० दिवसांची रजा मिळेल.
  • वैद्यकीय सल्ल्याने मेडिकल रजा असेल.
  • चार वर्षे पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज दिले जाईल, जे आयकराच्या कक्षेबाहेर असेल.
  • अग्निवीरांना पहिल्या वर्षी २१ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी २३ हजार १००, तिसऱ्या वर्षी २५ हजार ५५० आणि चौथ्या वर्षी २८ हजार रुपये मिळणार आहेत.
  • चार वर्षांनंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून १०.०४ लाख रुपये दिले जातील.
  • अग्निवीरांना गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा, वैद्यकीय सुविधा, कष्ट भत्ता यांचा लाभ मिळेल.
  • अग्निवीरांचा एकूण ४८ लाख रुपयांचा विमा असेल.
  • हौतात्म्य पत्करल्यानंतर नातेवाईकांना एकरकमी ४४ लाख रुपये आणि सेवा निधी पॅकेज दिले जाईल.
  • सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.
  • हवाई दलाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीरांना सन्मान आणि पुरस्कार प्रदान केले जातील.

Back to top button