पुढारी ऑनलाईन : सलमान खानला धमकी देऊन लॉरेन्स बिश्नोई गँगला फक्त प्रसिद्धी मिळवायची होती. त्याचवेळी त्याला आपल्या गँगची बड्या उद्योगपती आणि अभिनेत्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचे होते, असा खुलासा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
पुढे वळसे पाटील म्हणाले, सिद्धू मूसेवाला खून प्रकरणी संतोष जाधव याला अटक करण्यात आली असून, या खून प्रकरणातील इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. बिश्नोई गँगचा हा केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता. सलमान खान धमकी पत्र प्रकरणात जप्त केलेल्या पत्राची बिश्नोई गँगची फारशी लिंक सापडत नाही. मात्र पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे, मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सिद्धू मूसेवालाचा खून झाल्यानंतर बिश्नोई गँगला याचा फायदा उठवून स्वत:ची प्रतिष्ठा निर्माण करायची होती. याप्रकरणी काही लोकांना अटक केली असली तरी, याप्रकरणातील सर्व तथ्य समोर आलेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. याप्रकरणी स्पष्टता येण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
रविवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेले होते. फिरून परत आल्यानंतर सलीम खान यांना एक अनोळखी पत्र सापडले. ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.