नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या लष्कराला अधिक तरुण,सामर्थ्यशाली बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज महत्वाकांक्षी 'अग्निपथ भरती योजने'ची (Agnipath recruitment scheme ) घोषणा केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी योजना जाहीर करीत पत्रकार परिषदेतून त्यासंबंधी माहिती दिली. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल वीआर चौधरी आणि नौसेना प्रमुख अँडमिरल आर.हरी कुमार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठी युवकांची लष्करात भरती केली जाईल. लष्कर भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांसाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. जाणून घेवूया, या याेजनेतील महत्त्वाच्या तरतुदी
लष्कर सेवेची प्रोफाईल यूजफूल ठेवण्याचे लक्ष्य या योजनेचे आहे. युवकांचे आरोग्य तसेच 'फिटनेस' देखील त्यामुळे चांगले राहील. योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल. देशाच्या सकल घरगुती उत्पन्नात वाढीसाठी योजना महत्त्वाची ठरेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.चांगले पॅकेज, सेवा निधी पॅकेज तसेच डिसएबिलटी पॅकेजची देखील घोषणा करण्यात आली. (Agnipath recruitment scheme )
योजनेअंतर्गत लष्करात सामील होणाऱ्या तरुणांना 'अग्निवीर'म्हणून संबोधले जाईल. अत्यंत कमी वेळेसाठी युवकांच्या लष्कर भरतीचा मार्ग योजनेमुळे मोकळा झाला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. 'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून, त्यामध्ये जवानांना चार वर्षे लष्करात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. चार वर्षांनंतर जवानांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही जवानांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे जवान निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये ६ आणि ९ महिन्यांचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या जवानांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल.
एखादा अग्निवीर देश सेवे दरम्यान शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना सेवा निधी सह १ कोटींहून अधिकची रक्कम व्याजासकट दिली जाईल. यासोबतच उर्वरित नोकरीचे वेतन देखील दिले जाईल. कुठला अग्निवीरावर सेवेदरम्यान अपंगत्व आले तर त्याला ४४ लाख रुपयांपर्यंची रक्कम दिली जाईल. शिवाय उर्वरित नोकरीचे वेतन देखील दिले जाईल.
राजनाथ सिंह यांच्या घोषणेतील महत्वाचे मुद्दे
१) लष्करात बदल करून अत्याधुनिक बनवणार
२) तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्याची योजना
३) लष्करात सेवा करण्याची तरुणांना संधी
४) लष्करात वर्दी घालण्याची संधी मिळणार
५) लष्कराकडून चांगले वेतन मिळणार
६) ४ वर्षांच्या सेवेनंतर अनेक सुविधा मिळणार
लष्करात जवानांची कमतरता असल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्राप्त माहितीनूसार लष्करात दीड लाख सैनिकांची कमतरता असून दर महिन्याला त्यात आणखी पाच हजारांची भर पडतेय. महिन्याकाठी जवळपास पाच हजार सैनिक निवृत्त होत असून त्यांच्या रिक्त जागेवर भरती करणे आवश्यक होते. लष्करात सध्या १.२ दशलक्ष जवान आहेत. कोरोना काळापूर्वी दरवर्षी लष्कर भरतीचे आयोजन केले जाात होते. दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेची संकल्पना मांडली होती.
हेही वाचा :