मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यामुळे आमचा चौथा उमेदवार सहज विजयी होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
या वेळी जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, अपक्षांशी विविध स्तरावर चर्चा सुरू असून, याबाबत आपल्याला योग्यवेळी माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी काही लोकांची नाराजी होत असते; परंतु समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधी राहिलेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील.
सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत, यासाठी हे सर्व सुरु आहे. त्यामुळे कोणी- कोणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही भाजपा मोर्चेबांधणीचा प्रयत्न करणारच, असा टाेलाही पाटील यांनी लगावला.
जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, तो मते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. त्यात दोष देण्याची गरज नाही; पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील. विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्या सर्वांसाठी ही बैठक होती.
विधान परिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचलंत का ?