

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने अजूनतरी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही दोन दिवस वाट पाहून आमचा निर्णय घेऊ, असे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार कुस्ती रंगली आहे. या निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर अवलंबून आहे. एमआयएमचे दोन आमदार आहेत. हे आमदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात. याबाबत उत्सुकता आहे.
ओवैसी म्हणाले, की भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी. पण महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे, आम्ही आमचा निर्णय घेऊ.
आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत. निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय एक किंवा दोन दिवसांत घेऊ, असेही ओवैसी म्हणाले. त्यामुळे ओवैसी यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन मते आहेत. ही मते मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रयत्न चालविले आहेत. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे गिरीष महाजन यांनी सोमवारी रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणी केली. मात्र ठाकूर यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. महाजन यांच्या भेटीआधी संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. संजय राऊत आणि हितेंद्र ठाकूर यांचे मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहेत. पण ठाकूर ऐनवेळी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, महाजन यांची भेट राज्यसभेसाठी भाजप उमेदवारासाठी मते मागण्यासाठी होती. निवडणुकीत सर्वजण मते मागत असतात. त्यामुळे या भेटीत काही गैर नाही. आम्ही आमचा निर्णय पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून घेऊ, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. राज ठाकरे हे जो आदेश देतील तो आपण पाळणार असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. मात्र निवडणूक जवळ आली तरी मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.