राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग, शिवसेनेचे सर्व आमदार पंचतारांकित हॉटेलवर, फडणवीसांकडून अपक्षांना फोनाफोनी

राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग, शिवसेनेचे सर्व आमदार पंचतारांकित हॉटेलवर, फडणवीसांकडून अपक्षांना फोनाफोनी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना शिवसेना आणि भाजपच्या मतजुळवणीच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांची 'वर्षा'वर बैठक घेऊन त्यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कोरोनामुळे घरातच विलगीकरणात असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना स्वत: फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वर्षावर घेतलेल्या बैठकीत कुणाला घाबरू नका आणि कुणाला जुमानू नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मढ आयलंडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये वोल्वो गाड्यातून सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले. मतदानापर्यंत या आमदारांना आता या हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. मते फुटू नयेत यासाठी शिवसेना मोठी खबरदारी घेत आहे. या ठिकाणी शिवसैनिकांचा जागता पहारा राहणार आहे. वर्षावर झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, उमेदवार संजय पवार यांच्यासह काही अपक्ष आमदार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही आपल्या आमदारांना मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे हे आमदारही मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आमदारांनाही दोन्ही पक्ष बैठकीनंतर सुरक्षित ठिकाणी येणार आहेत.

राज्यसभेची निवडणूक 10 जूनला होत आहे. विधानसभेच्या 287 सदस्यांमधून हे सहा उमेदवार निवडून जाणार आहेत. काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 व भाजप 2 असे 5 उमेदवार आरामात निवडून जात आहेत. मात्र सहावा उमेदवार शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरस आहे.

भाजप आमदारांची उद्या बैठक

महाविकास आघाडीसोबतच भाजपने सुद्धा आपल्या आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. भाजप आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली असून भाजपची उद्या, बुधवारी बैठक होत आहे. भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. देवेंद्र फडणवीस यांनी काही अपक्ष आमदारांना फोन केल्यानंतर भाजपला यापैकी कोण पाठिंबा देऊ शकतात याची यादी तयार करण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. संख्याबळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तिसर्‍या उमेदवारासाठी भाजपला मोठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनाही अपक्षांची मदत लागणार असल्याने अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारल्याचे समजते.

'मविआ'चे आज शक्तिप्रदर्शन

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक होणार आहे. आघाडी सरकार स्थापन होताना जशी आमदारांना शपथ दिली, तसा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून आघाडी आपले संख्याबळ दाखवणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून आणण्यासाठीची एकत्रित रणनीती आखली जाणार आहे. या बैठकीत आघाडीच्या आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मतदान करायचे याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मंत्री टक्केवारी मागतात: जयस्वालांचा आरोप

अपक्ष आमदार आशीष जयस्वाल संध्याकाळी अपक्ष आमदारांच्या बैठकीला पोहोचल्याने शिवसेनेचा जीव भांड्यात पडला. ते शिवसेना आमदारांसोबत हॉटेल रीट्रीट हॉटेलला रवाना झाले. आशीष जयस्वाल हे शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान अपक्ष आमदार आहेत. त्यांनी राज्य सरकारवर उघड टीका केली होती. काही मंत्री हे आमदारांकडे टक्केवारी मागतात.

आमदार आहेत म्हणून सरकार आणि मंत्री आहेत. त्यामुळे आमदार या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती.राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्री बच्चू कडू यांच्यानंतर जयस्वाल यांनी हा गंभीर आरोप केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र जयस्वाल हे अपक्ष बैठकीला दाखल झाले. त्यामुळे त्यांची नाराजी सूर करण्यात शिवसेनेला यश आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news