शाळा बंदच राहणार; ठाकरे सरकारकडून शालेय विभागाचा निर्णय रद्द | पुढारी

शाळा बंदच राहणार; ठाकरे सरकारकडून शालेय विभागाचा निर्णय रद्द

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शाळा बंदच राहणार : येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी घेतला होता. मात्र, मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध केल्याने शाळा बंदच राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला आहे.

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयावर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत काल उशिरा बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

शाळा बंदच राहणार

या बैठकीत लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली. यावेळी शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.

18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा रद्द करण्याचा निर्णय झाला.

तिसऱ्या लाटेचा अभ्यास करुन दिवाळीनंतर शाळा सुरु करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत

राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने बुधवारी दिली. मंगल कार्यालये, इनडोअर खेळांनाही परवानगी दिली आहे.

तथापि, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आदी तूर्त बंदच राहणार आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने राज्यातील जनतेला कोरोना निर्बंधांतून जणू स्वातंत्र्य मिळाले आहे.

राज्यातील जनतेला दिलासा देणारी ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. कोरोना निर्बंधांतून शिथिलता देण्याचा निर्णय घेतल्याने दुकानदार, शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंटस् व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सायंकाळी पार पडली. यात राज्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांत आणखी शिथिलता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

हॉटेलचालक आनंदले!

राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी दिल्याने नक्कीच या क्षेत्रातील उलाढाल 50 टक्क्यांनी वाढेल, अशी प्रतिक्रिया आहार या रेस्टॉरंट चालकांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी कोरोना नियमावलीचे कठोर पालन करावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी द्या

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देणार्‍या शासनाने लवकरच मध्यरात्री दीड वाजेपर्यंत असलेली परवानगी पूर्ववत करण्याची गरज आहे. याआधी डायनिंगसाठी फक्त सायंकाळी 4 वाजेपर्यंत असलेल्या परवानगीमुळे म्हणावा तितका व्यवसाय होत नव्हता.

निर्णय स्वागतार्ह

गेले दीड वर्ष निर्बंधांमुळे राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्र प्रचंड अडचणीत आले आहे. काही जिल्ह्यात महापुरानेही व्यापार्‍याला मोठा तडाखा दिला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळांचे निर्बंध किंवा सवलती मिळाल्याने सर्वच व्यापारी वर्गात मोठी नाराजी होती. त्यानंतर घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. तसेच राज्य सरकारतर्फे राज्यातील व्यापार-उद्योग पूरक असे धोरण राबविण्यात यावे. पूरबाधित व्यापारी, उद्योजक व अन्य घटकांना विशेष आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

हे ही वाचलं का?

Back to top button