ENGvsIND दुसर्‍या कसोटी : भारतासमोर विजयाचे ‘टार्गेट’ | पुढारी

ENGvsIND दुसर्‍या कसोटी : भारतासमोर विजयाचे ‘टार्गेट’

लंडन ; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड (ENGvsIND) यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यास उद्यापासून (गुरुवार) लॉर्डस् मैदानावर सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या कसोटीत भारताला फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. शार्दुल जखमी झाल्याने फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विनला अंतिम एकादशमध्ये सहभागी करून घेण्याबाबत कर्णधार विराट कोहली विचार करू शकतो. (ENGvsIND)

पावसामुळे पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. गोलंदाजांच्या कामगिरीमळे या सामन्यात भारत विजय मिळवण्याच्या स्थितीत होता. मात्र, पहिल्या डावात संघाला 278 धावांच करता आल्या होत्या. तीन प्रमुख फलंदाज कोहली, पुजारा आणि रहाणे यांना चमक दाखवता आली नव्हती. रहाणेची मेलबर्न कसोटीमधील शतकी खेळी सोडल्यास या तिघांनीही गेल्या दोन वर्षांत मोठी खेळी केलेली नाही. शार्दुलच्या दुखापतीमुळे फलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतो. जडेजाची फलंदाजी पाहता त्याचे स्थान निश्‍चित समजले जात आहे.

लॉर्डस्मध्ये सरावावेळी ठाकूरची दुखापत वाढल्याने अश्‍विनला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शार्दुल न खेळल्यास कोहलीला गोलंदाजी संयोजनाबाबत विचार करावा लागेल. कोहली जर चार गोलंदाजांसोबत मैदानात उतरला तर, ठाकूरच्या जागी इशांत शर्मा किंवा उमेश यादवला स्थान मिळू शकते; पण हा निर्णय सोपा नसेल. जर फलंदाजी मजबूत करायची झाल्यास अश्‍विनला संधी मिळू शकते. तो लॉर्डस्च्या खेळपट्टीवर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गोलंदाज म्हणून निर्णायकदेखील ठरू शकतो.

दुसरीकडे इंग्लंडच्या युवा फलंदाजांनी निराशा केली आहे. कर्णधार जो रूटने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसर्‍या डावात शतक झळकावत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. (ENGvsIND)

रोरी बर्न्सऐवजी संघात हसीब हमीदला संधी मिळण्याची शक्यता आहे. हमीदने गेल्या महिन्यात भारताविरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात डावाची सुरुवात करीत शतक झळकावले होते. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडदेखील दुखापतग्रस्त आहे. या खेळपट्टीमधून फिरकीला मदत मिळाल्यास मोईन अलीला संघात स्थान मिळू शकते. दरम्यान, लँकेशायरचा वेगवान गोलंदाज साकिब महमूद याची इंग्लंडच्या संघात वर्णी लागली आहे. त्याला कव्हरच्या रूपात संधी मिळाली आहे.

संघ यातून निवडणार :

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), अभिमन्यू ईश्‍वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राऊली, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेंन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली, मार्क वूड.

Back to top button