पुढारी ऑनलाईन डेस्क : डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव :अवघ्या जगाच्या मागे कोरोनाचा भस्मासुर सोडून नामानिराळा राहिलेल्या चीनमध्येच आता कोरोनाच्या 'डेल्टा प्लस व्हेरियंट'ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
चीनच्या पाच प्रांतांत कोरोनाच्या या प्रकाराचा वेगाने फैलाव सुरू असून, राजधानी बीजिंगसह चीनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांत कडक लॉकडाऊन लागू केला आहे.
'कोरोनाचा भस्मासुर' : डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुवेई प्रांतातील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मागील दोन वर्षांत कोरोनाने अवघ्या जगाला कवेत घेतले.
कोरोना जगभर थैमान घालत असताना चीनमध्ये मात्र सगळे आबादीआबाद होते. त्यामुळे कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याचा संशय जगभरातील देशांना आजही आहे.
मात्र, चीनने नेहमीच या आरोपांचा इन्कार केला होता, तरीदेखील अनेक देशांनी चीनला यासाठी जबाबदार धरून वेगवेगळ्या माध्यमातून बहिष्कृत करायला सुरुवात केली आहे.
डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 94 हजारांवर पोहोचली, त्यामध्ये त्यानंतर वाढ झाली नसल्याचा चीनचा दावा आहे.
मात्र, गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने होत असल्याचे स्थानिक सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या जियांगत्सू प्रांतातील गांजिंग विमानतळावरून कोरोनाच्या या विषाणूने चीनमध्ये प्रवेश केल्याचे मानले जात आहे.
अल्पावधीतच या विषाणूने चीनच्या जियांगत्सू, हूनान, यांगत्सू आणि हुवेई प्रांतात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या भागात डेल्टा प्लसचे हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवड्यापासून राजधानी बीजिंगसह देशातील प्रमुख बारा शहरांत आणि अन्य काही प्रांतामध्ये नव्याने लॉकडाऊन लागू केले आहे.
दररोज लाखो लोकांची चाचणी केली जात आहे. चीनच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे शुकशुकाट आहे.
चीनची कोरोना प्रतिबंधक लस नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटपुढे निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याचप्रमाणे कोरोनाच्या या नव्या प्रकारावर लस शोधण्यात चीनला अजून किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.
एकूणच जगाला आपल्या विस्तारवादी सापळ्यात अडकविण्यासाठी चीनने लावलेल्या कोरोनाच्या सापळ्यात चीन आता स्वत:च अडकू लागला आहे.
डेल्टा व्हेरियंटमुळे पाच प्रांतांमध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
आजपर्यंत कोरोनाचे योग्य नियंत्रण केल्याचा दावा करणार्या चीनमधील कम्युनिस्ट राजवटीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे मत अमेरिकेतील जागतिक विश्लेषक गॉर्डन चँग यांनी व्यक्त केले आहे.