आता अकरावी प्रवेशाचे टेन्शन वाढले | पुढारी

आता अकरावी प्रवेशाचे टेन्शन वाढले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या मूल्यमापनाच्या आधारावर लागलेल्या निकालात छप्पर फाड के गुण मिळाल्यामुळे प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश होणार तरी कसे असा प्रश्न पडला आहे. पॉलिटेक्निक आणि आयटीआय प्रमाणे आता अकरावी चे प्रवेश जर दहावीच्या गुणावर झाले तर नामवंत महाविद्यालयांची कटऑफ 95च्या वर पोहचेल आणि प्रवेशासाठी काँटे की टक्कर होणार मात्र निश्चित आहे.

अकरावीला प्रवेश घेताना मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरात नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दहावीला मिळालेल्या गुणांची मोठी टक्कर पहायला मिळते. अकरावी ऑनलाइन प्रवेशात केंद्रीय विद्यार्थी आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी 90 प्लस संघर्ष पहायला मिळतो.

दरवर्षी 90 प्लस टक्केवारीच्या आधारावरच विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालये काबीज करण्याची धडपड असते. यंदा मात्र परिस्थिती कोरोनामुळे वेगळी आहे. दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या आणि मूल्यमापनावर आधारीत निकाल जाहीर झाला.

तब्बल 99 टक्केहून अधिक निकाल सर्वच मंडळाचे लागले आहेत. पैकीच्या पैकी गुणांची थेट खैरात झाल्याने प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार होती. या सीइंटीच्या गुणावरच प्रवेश होणार होते. आता ही परीक्षाच न्यायालयाने रद्द केल्याने प्रवेश होणार तरी कसे असा प्रश्न आहे.

मुंबईचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. या विभागात 1 लाख 10 हजार 979 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर एक लाख 59 हजार 811 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यामुळे प्रवेश परीक्षा देणारे विद्यार्थी अधिक असतील असा अंदाज प्राचार्य व्यक्त करीत आहेत.

मोठ्या टक्केवारीचे यश हे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी नाही तर सीईटीत मिळालेल्या गुणावरच अकरावी प्रवेशाची चुरस असलेले चित्र पाहायला मिळणार आहे.

गुणांवर प्रवेश झाले तर काय होईल?

* विज्ञान आणि वाणिज्य शाखेत मोठी चुरस होईल. नामवंत महाविद्यालयाच्या कला शाखेचीही कटऑफ वाढणार

* अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत 90 प्लस असेलच पण टक्केवारीच्या पाँईटवर जागा पटकविण्यासाठी स्पर्धा होईल..

* गतवर्षी वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील नामांकित महाविद्यालयातील पहिल्या यादीतील कट ऑफने आज 95 टक्क्यांचा आकडा पार केला होता. यंदा 99 असेल

* गतवर्षी 85च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालयासाठी दुसर्‍या व तिसर्‍या यादीशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. यंदा काय असेल याचीच चिंता

* सर्वच विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांची अपेक्षा धरतील, प्रवेश न मिळत असल्याने प्रवेशाच्या फेरी वाढतील आणि प्रवेश प्रक्रिया लांबेल

बेस्टफाईव्ह लढा पुन्हा चर्चेत

दहा वर्षापूर्वी केंद्रीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळाचे विद्यार्थी प्रवेशात मागे राहत होते. नामवंत महाविद्यालये मिळत नव्हती म्हणून अकरावी प्रवेशाचे सूत्र म्हणून पाचच विषयांचे गुण ग्राह्य धरण्याचा बेस्ट ऑफ फाईव्ह पर्याय राज्य मंडळाने सर्वोच्च न्यायालयात लढा देत लागू केला.

सीईटी रद्द केल्यानंतर हा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्रीय मंडळाची राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 75 हजारावर आहे. त्या तुलनेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 15 लाखावर आहे. राज्य मंडळाची संख्या जास्त असली तरी ही इतर मंडळाची कमी असणारी विद्यार्थी संख्या दहावीनंतरच्या प्रवेशात विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते यामुळे बेस्ट फाईव्ह आणला.

कोरोनामुळे मूल्यमापन पद्धत आणल्यानंतरही प्रवेशासाठी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. यंदा टक्केवारी सर्वच प्रमाणात वाढली आहे हे जरी मान्य असले तरी राज्य मंडळातील विद्यार्थी मागे राहतील अशी भीती आहे. 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळूनही विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळणार नाही.

स्वयंअर्थसाहाय्यावरील महाविद्यालये बंद होतील

जागा पुन्हा वाढणार राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये समान न्याय मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने आता नामांकित महाविद्यालयात जागा वाढवून द्याव्यात अशी मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र पायाभूत सुविधा आणि शिक्षक मिळणार का असाही प्रश्न संस्थाकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मुंबईत दरवर्षी दुय्यम महाविद्यालयातील सुमारे 1 लाख जागा रिकामी राहतात यंदा आणखी जागा नामवंत महाविद्यालयातील वाढल्या तर दुय्यम महाविद्यालयांना कुलुप लावण्याशिवाय आता पर्यायच राहणार नाही असा सूर आहे. त्यामुळे स्वयंअर्थसहाय्यच्या माध्यमातून सुरु असलेली महाविद्यालये मात्र बंद होतील असाही अंदाज आहे.

Back to top button