मुंबई : रेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक | पुढारी

मुंबई : रेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून शेतकऱ्यासह चौघांची १८ लाखांना फसवणूक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून ठगाने कोल्हापूरच्या शेतकऱ्यासह मुंबईतील चार जणांची 18 लाखांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाड्यामध्ये समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी राजाराम सातपुते विरोधात गुन्हा दाखल करुन भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहे.

मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले नामदेव ढोकरे हे चिंचपोकळी परिसरात वास्तव्यास आहेत. त्याच परिसरात राहणाऱ्या श्रावण नावाच्या व्यक्तीच्या ओळखीतून त्यांची ओळख राजाराम सातपुते याच्यासोबत झाली. सातपुते याने तो सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी करत असून बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देत असल्याचे सांगितले.

सातपुते याने ढोकरे याच्याकडे पावणे तीन लाख रुपयात 15 दिवसांत नोकरी मिळेल असे सांगितले. तसेच, त्याने ढोकरे यांना त्यांच्या ओळखीचे आणि नातेवाईकांना देखील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. नोकरीच्या शोधात असलेल्या ढोकरे याने त्याला नोकरीसाठी होकार दिला. त्यानंतर ढोकरे याने सातपुते याला परेल रेल्वे वर्कशॉपमध्ये जाऊन पैसे पोच केले.

सातपुते याने ढोकरे याच्यासह चौघांजवळून एकूण 17 लाख 99 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर सातपुते हा पसार झाला. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री पटली. अखेर त्यांनी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात फसवणूक केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे.

हेही वाचा

Back to top button