Shatrughan Sinha Biography : अमिताभ बच्चन यांना वाटत होती शत्रुघ्न सिन्हांच्या स्टारडमची भिती | पुढारी

Shatrughan Sinha Biography : अमिताभ बच्चन यांना वाटत होती शत्रुघ्न सिन्हांच्या स्टारडमची भिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटसृष्टीत बड्या स्टार्समध्ये नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते आणि कधी कधी त्याचे रुपांतर शत्रुत्वात होते. मग कधी कधी एखादा अभिनेता दुसऱ्या अभिनेत्याला स्वतःच्या पुढे जाऊ देत नाही आणि त्यासाठी ते कोणतीही युक्ती वापरतात. १९७० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले, तेव्हा असेच काहिसे घडले होते. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Biography) यांनी त्यांना टक्कर देण्यास सुरुवात केली होती. ‘एनिथिंग बट खामोश’ या आपल्या आत्मचरित्रात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्या काळातील आठवणी लिहल्या आहेत. त्यांनी लिहले आहे, अमिताभ यांना त्यांच्या काही चित्रपटांमध्ये माझ्यासोबत काम करायचे नव्हते. मला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद मी पाहू शकत होतो, असे त्यांनी सिन्हा यांनी लिहिले आहे.

त्या काळात अमिताभ आणि शत्रुघ्न (Shatrughan Sinha Biography) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, अमिताभ यांना त्यांच्यासोबत काम करण्यात फारसा रस नव्हता. त्यानी लिहिले आहे की, “अडचण ही होती की मला माझ्या कामगिरीसाठी चाहत्यांकडून टाळ्या मिळत होत्या.” यश चोप्रा यांच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात काम करताना या दोन स्टार्समधील वैर शिगेला पोहोचले होते.

सिन्हा (Shatrughan Sinha Biography) यांनी लिहिले की, “आम्ही एका ठिकाणाहून एकाच हॉटेलमध्ये जात होतो, पण ते त्यांच्या कारमध्ये बसायचे आणि ‘चला एकत्र जाऊ’ असे कधीच म्हणायचे नाही. मला हे सर्व खूप विचित्र वाटायचे आणि मला आश्चर्य वाटले की असे का होत आहे, कारण माझ्याकडे त्यांच्याविषयी कधीच काही तक्रार नव्हती.

काला पत्थर व्यतिरिक्त शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांनी नसीब, शान, दोस्तानामध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिले आहे की, आमची जोडी पडद्यावर खूप गाजली होती, पण अमिताभ बच्चन यांना वाटत होते की शत्रुघ्न सिन्हा त्यांना वरचढ ठरत आहेत. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबतचे अनेक चित्रपट सोडले आणि अनेक चित्रपटांसाठी घेतलेली आगाऊ रक्कमही परत केली.

मात्र, कालातंराने दोघांमधील मतभेद दूर झाले. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, कुली चित्रपटाच्या सेटवर जेव्हा त्यांना दुखापत झाली, तेव्हा मी आणि माझी पत्नी पूनम सिन्हा अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो. त्याच बरोबर अमिताभ यांचे दिवंगत आई-वडिल हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्याशीही त्यांचे प्रेमळ संबंध होते.

Back to top button