औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : टेलिग्रामवर 'उम्मत-ए-मुहम्मदिया' नावाचा ग्रुप बनवून 'इसिस' संघटनेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मुंब्रा आणि औरंगाबादेतील नऊ जणांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जानेवारी 2019 मध्ये अटक केली होती. तसेच, एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध औरंगाबादेतील बाल न्यायमंडळात खटला चालविण्यात आला. त्याला भादंवि कलम 120 (ब), 18, 20, 38, 38 यूएपीए अन्वये दोषी ठरविले असून बाल न्याय अधिनियम कलम 18 (जी) च्या तरतुदीनुसार तीन वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे लँडमार्क जजमेंट असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद आणि मुंब्रा येथील काही तरुण टेलिग्रामवरील 'उम्मत ए मुहम्मदीया' हा ग्रुप तयार करून इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाने 21 जानेवारी रोजी मुंब्रा आणि औरंगाबादेत छापे मारून दहा जणांना ताब्यात घेतले. यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश होता. ही टोळी विशिष्ट धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात घुसखोरी करून तेथील प्रसाद व पिण्याच्या पाण्यात विष कालवून नरसंहार करण्याच्या तयारीत होती. त्यासाठी त्यांनी काही भागांमध्ये रेकीदेखील केली होती. काम फत्ते झाल्यावर हे सर्वजण सिरियाला पळून जाणार होते, अशी माहिती समोर आली होती.
एटीएसचे तत्कालिन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, सहायक पोलिस आयुक्त सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, विजयंत जैस्वाल यांच्या पथकाने संशयित अतिरेकी मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजीद (औरंगाबाद), मोहसिन सिराउद्दीन खान, मजहर अब्दुल रशिद शेख, मोहम्मद तकी सिराजुद्दीन खान, मोहम्मद सर्फराज अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन खान, फहाद मोहम्मद इस्तेयाक अन्सारी, तल्हा हनिफ पोतरीक (रा. सर्व मुंब्रा, ठाणे) या नऊ जणांना मुंब्रा आणि औरंगाबाद येथून अटक केली होती. त्या सर्वांविरुद्ध जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 120 ब, 201, सहकलम 18, 20, 38, 39 बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायदा, 1967 सह 135 महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध एनआयए विशेष प्राधिकृत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून तेथे खटला चालू आहे.
एटीएसने अटक केलेल्या नऊ जणांपैकी तल्हा हनिफ पोतरिक हा कुख्यात अतिरेकी अबू हमजाच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. अबू हमजा हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. तो दीड वर्षे त्याच्या संपर्कात होता. त्यासोबतच 'उम्मत-ए-मुहम्मदिया' या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याकडे इसिसचे लिटरेचर आढळून आले. काही व्हिडिओ आणि फोटोदेखील एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारेच विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्यायमंडळाने कलम १२० ब, भादंवि कलम १८, २०, ३८, ३८ युएपीए अन्वये दोषी ठरविले. त्याला कलम १८ (ग) नुसार तीन वर्ष स्पेशल होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयात सरकारी अभियोक्ता ॲड. मंगेश जाधव यांनी काम पाहिले. दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून औरंगाबाद युनिटचे सहाय्यक निरिक्षक पुरुषोत्तम देशमुख, जमादार मनगटे यांनी काम पाहिले.
हेही वाचा