मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सेक्सॉर्टशन रॅकेटच्या माध्यमातून घोड्यांच्या प्रशिक्षकाला जाळ्यात ओढून पैसे उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना गावदेवीमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
यातील 54 वर्षीय तक्रारदार हे नौरोजी गमाडीया रोड परिसरात रहातात. ते घोड्यांचे प्रशिक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या फेसबुकवर कोमल शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंडरिक्वेस्ट आली. तक्रारदार यांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर तिने फेसबुक मेसेंजरवरुन तक्रारदार यांच्याशी चॅट सुरु केले. पुढे तिने तक्रारदार यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर घेत व्हाट्सअॅप चॅट सुरु केले.
रात्रीच्या वेळी तिने व्हाट्सअॅपवर व्हिडीओ कॉल केला. यावेळी ती नग्न अवस्थेत होती. तिने तक्रारदार यांनाही कपडे काढण्यास भाग पाडले. काही वेळाचा व्हाट्सअॅपवर व्हिडीओ कॉल झाल्यानंतर तक्रारदार यांना व्हाट्सअॅपवर एक मेसेज आला. व्हिडीओ कॉल रेकार्ड केला असल्याचे सांगत हा व्हीडीओ फेसबुक, युटयुबवर अपलोड न करण्यासाठी 31 हजार 700 रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी पैसे पाठविण्यास नकार देत तो नंबर ब्लॉक केला. नंतर अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल त्यांनी उचलले नाही. त्यानंतर आयपीएस ऑफिसर राकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तक्रारदार यांना कॉल करुन तक्रारदार यांचा एक व्हिडीओ युटयुबर अपलोड झाला असून त्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले. व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याने एका क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.
तक्रारदार यांनी या क्रमांकावर कॉल केला असता यु टयुब येथुन संजय सिंग बोलत असल्याचे सांगितले. त्याने युटयुबवरील व्हीडीओ डिलीट करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी घाबरून ही रक्कम पाठविली. पैसे पाठविल्यानंतर तक्रारदार यांनी व्हिडीओ डिलीट केला अशी विचारणा केली असता त्याने आणखी एक व्हिडीओ असून तो डीलीट करण्यासाठी अजून 21 हजार 500 रुपये उकळले.
पुढे तक्रारदार यांच्या विरोधात दाखल असलेला एफआयआर दाखल रद्द करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. एफआयआर दाखल झाल्याचे ऐकून तक्रारदार घाबरले. त्यांनी 80 हजार रुपये पाठवले. त्यानंतर राकेश अग्रवाल यांच्याबाबत गुगलवर माहिती पाहिली असता ते पंजाब पोलीसचे वरिश्ठ अधिकारी असल्याचे समजले. त्यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रारदार यांची खात्री पटली.
अखेर त्यांनी गावदेवी पोलीस ठाणे गाठून या सेक्सॉर्टशन रॅकेटच्या माध्यमातून 01 लाख 23 हजार रुपये उकळण्यात आल्याची तक्रार दिली आहे.
हेही वाचा