‘हनी ट्रॅप’पासून राहा सावधान! नाशिक ग्रामीण पोलिसांचे आवाहन | पुढारी

‘हनी ट्रॅप’पासून राहा सावधान! नाशिक ग्रामीण पोलिसांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर ओळख वाढवून चॅटिंग व व्हिडिओ कॉलवरून अश्लील संभाषण करून हनी ट्रॅपमध्ये फसवून आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे हनी ट्रॅपमध्ये कोणीही अडकू नये, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावरून केले आहे.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक, टि्वटर, व्हिडिओ कॉलिंग, वुई चॅट अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमांतून सावज हेरून त्यांना प्रेमाचे किंवा शारीरिक आकर्षण दाखवले जात आहे. सुरुवातीस मुलींचे छायाचित्र पाठवून समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानुसार नागरिक या आमिषाला बळी पडत असून, ते देखील त्यांचे स्वत:चे छायाचित्र पाठवतात किंवा व्हिडिओ कॉल करून स्वत:ची ओळख देतात. समोरील व्यक्ती छायाचित्र किंवा व्हिडिओ जतन करून ब्लॅकमेल करत आहेत. समोरील व्यक्तीकडून पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास समाजात बदनामी करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा दबावाला बळी न पडता पोलिसांकडे तक्रार करावी, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींसोबत संवाद न साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
अनोळखी व्यक्तींशी चॅट करण्याच्या मोहात पडू नका. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती साठवू नका कोणाला देऊ नका. अनोळखी प्रोफाइल ब्लॉक करा. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग अथवा व्हिडिओ चॅटिंग टाळा. आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो याची काळजी घ्या. फोटो एडिट, फॉर्म करू शकतात. सायबर गुन्हेगारांच्या धमकीला थारा देऊ नका. हनी ट्रॅप झाल्याचे कळताच धमक्यांना बळी पडू नका. बळी पडल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button