मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरीतील पारशी वाडा स्मशानभूमीत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाला पुत्र अमेय यांनी मुखाग्नी दिली.
आमदार रमेश लटके यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार लटके यांची अंत्ययात्रा कामगार कल्याण भवन येथून मार्गस्थ झाली. अंत्ययात्रा गुंदवली मोगाविरा बँक, आमदार रमेश लटके यांचे जनसंपर्क कार्यालय, वर्मानगर, जुना नागरदास रोड, शिवसेना शाखा, पारसी पंचायत रोड, पंपहाऊस सबवे, आघाडीनगर, शेर- ए-पंजाब, गुरुद्वारा सर्कल, शांतीनगर, हॉली फॅमिली स्कूल, चकाला वजन काटा, सिगरेट फॅक्टरी, मार्गे पारशी वाडा स्मशानभूमीत साडेतीनच्या दरम्यान पोहोचली.
यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे अंधेरी पूर्वेतील कामगार कल्याण भवन येथे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, रमेशच्या जाण्याने जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आम्ही गमावला आहे. शिवसेनेचे न भरून येणारे हे नुकसान आहे. मला वाटत नाही की, त्यांनी कुणाला नाही म्हटले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर, संजय राऊत, सुनील राऊत, रवींद्र वायकर, नीलम गोऱ्हे, भाजप नेते आशिष शेलार, मुरजी पटेल यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.
हेही वाचलंत का ?