बारामतीच्या नादी लागून, राजकीय पटलावर डाव टाकू नका ; सदाभाऊ खोतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला | पुढारी

बारामतीच्या नादी लागून, राजकीय पटलावर डाव टाकू नका ; सदाभाऊ खोतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मानवत (परभणी) ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अडीच वर्षात राज्यात शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप राज्य सरकारने ग्रामीण भागासंदर्भात एकही घोषणा केलेली नाही. आता तरी मुख्यमंत्र्यांनी बारामतीकरांच्या नादी लागून, राजकीय पटलावर डाव टाकू नये. यातच जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांचे भले होईल, असा खोचक सल्ला माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. गुरुवारी (दि. १२) मानवत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा ‘ या रयतक्रांती संघटनेच्या वतीने आयोजित यात्रेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. २९ एप्रिलला कोकणातून निघालेल्या या यात्रेचा समारोप म्हाडा तालुक्यात २० मे रोजी होणार आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने ग्रामीण भागासाठी कोणतीही मोठी घोषणा केली नसून, शेतीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने आता तरी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सध्या राज्यात २० लाख मेट्रिक टन ऊस गाळपा विना शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे सांगत बारामतीकरांच्या नादाला लागून राजकारणाच्या पटलावर डाव टाकू नका. कारण बारामतीकर चाणाक्ष आहेत, त्यांना राजकारणाची हवा ओळखून कधी पावसात भिजावे हे चांगले समजते, असा टोला लगावत मुखमंत्र्यांनी आता तरी ग्रामीण भागाकडे बघावे अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. सदरील पत्रकार परिषदेस भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू, जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, रामभाऊ शिंदे, मदन महाराज शिंदे, विश्वनाथ लाडाने आदी उपस्थित होते.

हेही वाचलत का ?

Back to top button