underworld don Dawood Ibrahim
underworld don Dawood Ibrahim

दाऊद टोळीला हादरा! एनआयएकडून आरिफ आणि शब्बीर शेखला अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यात छापेमारी केलीय. यानंतर याप्रकरणाशी संबंधित रडारवर असलेल्यांपैकी आरिफ अबूबकर शेख (वय ५९) आणि शब्बीर अबूबकर शेख (वय ५१) या दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. दोघेही ओशिवरा येथील रहिवासी आहेत. या दोघांचे दाऊदचा विश्‍वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याच्याशी झालेले आर्थिक व्यवहार समोर आले आहेत.

एनआयएच्या पथकांनी सोमवारी पहाटे अचानक डी कंपनीचे शार्पशूटर, ड्रग्ज तस्कर, हवाला ऑपरेटर, बांधकाम क्षेत्रातील हस्तक आणि गुन्हेगारी सिंडिकेटमधील अन्यप्रमुखांच्या मुंबईतील २४ आणि ठाण्यातील पाच अशा एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली. एनआयएने या छापेमारीमध्ये काही महत्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक दस्ताऐवज, रोख रक्कम आणि पिस्तूल असा ऐवज ताब्यात घेतला आहे.

ताब्यात घेतलेल्या कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांच्या आधारे एनआयए दाऊद टोळीच्या टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मग्लिंग आणि बनावट चलनाच्या पुरवठ्यासह आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. यासाठी एनआयएने छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आणि शब्बीर शेख अशा १८ जणांकडे कसून चौकशी सुरु केली आहे.

एनआयएने सलग चार दिवस केलेली चौकशी आणि तपासात आरिफ आणि शब्बीर यांचे छोटा शकील याच्याशी झालेले आर्थिक व्यवहार समोर आले. अखेर एनआयएने गुरुवारी रात्री उशिरा या दोघांना अटक केली. या दोघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयएची ही कारवाई दाऊद टोळीला एक मोठा हादरा मानला जात आहे. दाऊद टोळीचे मुंबईतील खंडणी वसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेटमधील काही हस्तक अंडरग्राऊंड झाल्याची माहिती मिळते.

दाऊद टोळीशी संबंधीत प्रकरणात चौकशी सुरू असलेल्यांचा मुंबईतील ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांशी काही ना काही संबंध जोडला गेला आहे. हे सर्व जण एनआयएसोबतच ईडी आणि आयबी या केंद्रीय यंत्रणाच्या रडारवर आहेत. या सर्वांकडून तपास यंत्रणा दाऊदच्या मुंबईसह देशभरात पसरलेल्या साम्राज्याची माहिती गोळा करण्यासोबतच खंडणी वसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेट यातील आर्थिक व्यवहार आणि सिंडिकेट बाबत चौकशी करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news